बेकायदा डंपर वाहतूक न रोखल्यास मनसे करणार आंदोलन

तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांचा इशारा

मालवण दि प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील कालावल तसेच कर्ली खादीपट्ट्यातून दररोज बेकायदेशीररित्या शंभरहून अधिक डंपर वाळू उपसा होत असून महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू असलेला हा बेकायदेशीर वाळू उपसा आणि त्या अनुषंगाने चौके – नेरूरपार मार्गे कुडाळ मार्गावरून दररोज होणारी अवैध वाळू वाहतूक यावर महसूल प्रशासनाचा अंकुश नसल्याचे स्पष्ट करते . भरधाव वेगाने धावणाऱ्या या डंपरमुळे अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे या मार्गावर होणारी बेकायदेशीर वाळूची डंपर वाहतूक न रोखल्यास मनसेच्यावतीने नेरूरपार पुलावर डंपर रोखले जातील आणि होणाऱ्या परिणामास महसूल प्रशासन जबाबदार राहील असा सणसणीत इशारा मनसे मालवण तालुकाप्रमुख विनोद सांडव यांनी दिला आहे.

मालवण तालुक्यातील अवैध वाळू उत्खनन हे पर्यावरणासाठी घातक आहेच. शिवाय यामुळे जिल्ह्याचा वैध मार्गाने येणारा महसूलही बुडत आहे. ही वाळू वाहतूक करणारे परराज्यातील पासिंगचे डंपर नागरीक व इतर रहदारीसाठी एक मोठी समस्या बनली आहे. यामुळे मालवण ते कुडाळ मार्गावरील सामान्य नागरीक जीव मुठीत धरुन प्रवास करत आहेत. अलीकडेच या भरधाव डंपरमुळे सागरी महामार्गावर एका पाळीव जनावराचाही अंत झाला.

तालुक्यातील हडी, कालावल, बांदिवडे, आंबेरी येथून हे अवैध वाळू उत्खनन होते. त्यानंतर संध्याकाळनंतर संपूर्ण रात्रभर हीच वाळू वाहतूक करणारे डंपर एकामागोमाग एक सुसाट वेगाने सुटतात. याबाबत मनसेने नुकत्याच झालेल्या एस. टी. व डंपर अपघाताबाबत वाचा फोडली. या सर्व गोष्टी महसूल व इतर प्रशासनाच्या समक्ष घडत असल्याचा आरोप मनसे तालुकाप्रमुख विनोद सांडव यांनी केला आहे. यासंबंधी वारंवार इशारे देऊनही हे अवैध प्रकार थांबत नसल्याने आता मनसे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून मनसे थेट नेरूरपार पुलावर अशा वाहनांबद्दल आंदोलन करणार असल्याचा इशारा श्री सांडव यानी दिला आहे.

You cannot copy content of this page