विविध मागण्यांसाठी कुर्ली वासीयांचे उपोषण सुरूच : जीवित हानी झाल्यास प्रशासन जबाबदार : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
*💫सिंधुदुर्गनगरी दि.०१-:* नवीन ग्रामपंचायत व्हावी, १८ नागरी सुविधा मिळाव्यात या मागण्यांसाठी नवी कुर्ली ग्राम विकास मंडळाचे आज ७ व्या दिवशीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. दरम्यान येत्या ४ दिवसात आपल्या मागण्यांबाबत उचित कार्यवाही न झाल्यास ५ फेब्रुवारी रोजी हे आंदोलन देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्प येथे स्थलांतरित करण्यात येवून त्या ठिकाणी पूर्वसूचना न देता अचानक ” जल समर्पण ” करण्याचा निर्धार या मंडळाने केला असून या वेळी जीवित हानी झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही प्रशासनाला दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पात विस्थापित झालेल्या कुर्ली व घोणसरी गावातील प्रकल्प ग्रस्थांचे १९९५ मध्ये फोंडा लोरे येथे नवीन कुर्ली म्हणून पुनर्वसन करण्यात आले. तसेच २००२ मध्ये नवीन कुर्ली हे गाव महसुली गाव म्हणुनही घोषित झाले. त्यामुळे या ठिकाणी स्वतंत्र ग्रामपंचायत असावी, प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणाऱ्या १८ नागरी सुविधा मिळाव्यात. तसेच पर्यायी शेतजमीन उपलब्ध करून देण्यात यावी. या मागणीसाठी नवीन कुर्ली ग्राम विकास मंडळाच्या वतीने गेली २५ वर्षे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र त्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने या मंडळाच्या वतीने अनेक वेळा उपोषण आंदोलने करण्यात आली. त्याकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या मंडळाने २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू करून त्याचे रूपांतर साखळी उपोषणात केले होते. या साखळी उपोषणाचा आज सातवा दिवस असून आजही हे आंदोलन सुरू आहे. मात्र अद्यापही प्रशासनाने या उपोषणाची दखल न घेतल्याने येत्या ४ दिवसात आपल्या मागण्यांबाबत उचित कार्यवाही न झाल्यास ५ फेब्रुवारी रोजी हे आंदोलन देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्प येथे स्थलांतरित करण्यात येवून त्या ठिकाणी पूर्वसूचना न देता अचानक ” जल समर्पण ” करण्याचा निर्धार या मंडळाने केला असून या वेळी जीवित हानी झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही प्रशासनाला दिला आहे. तसे निवेदन जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांना देण्यात आले.
