डंपरचे गोव्याच्या हद्दीत पलायन_
*💫बांदा दि.०१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात बेकायदा वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरचा महसूलच्या पथकाने बांदा शहरात बांदा-पत्रादेवी रस्त्यावर थरारक पाठलाग केला, मात्र भरधाव वेगात डंपरने डिंगणे-बांदा एसटीला धडक देत गोव्याच्या हद्दीत पलायन केले. ही घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्ह्यातून गोव्यात बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर महसूलच्या पथकाकडून कारवाई करण्यासाठी बांदा येथे मुंबई-गोवा महामार्गावर सापळा रचण्यात आला होता. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास डंपरने महसूल पथकाला हुल देत महामार्गावरून बांदा शहरात धूम ठोकली. पथकाने देखील डंपरचा थरारक पाठलाग सुरू केला. आज आठवडा बाजार असल्याने डंपर चालकाने भरधाव वेगात पत्रादेवीच्या दिशेने पलायन केले. बांदा-पत्रादेवी रस्तावर लकरकोट येथे डंपरने समोरून येणाऱ्या डिंगणे-बांदा एसटीला धडक दिली. धडकेनंतर डंपर चालक त्याठिकाणी न थांबता गोव्याच्या दिशेने पलायन केले. डंपर गोव्यात गेल्याने महसूल पथकाला सिंधुदुर्ग-गोवा सीमेवरून हात हलवत माघारी परतावे लागले.
