भंडारी एज्युकेशन सोसायटी मुंबईचे अध्यक्ष विजय पाटकर यांचा आरोप_*
*💫मालवण, दि०१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षण विभागातील वेतन पथकातील काही कर्मचाऱ्यांच्या अडेलतट्टू पणाचा फटका मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूलला बसत असून हे कर्मचारी जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा गंभीर आरोप भंडारी एज्युकेशन सोसायटी मुंबईचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी केला आहे. भंडारी एज्युकेशन सोसा हायस्कूल या संस्थेची वेतन देयके व इतर शैक्षणिक कामांच्या कागदपत्रांच्या प्रस्तावांची परिपूर्तता करूनही गेली पाच वर्षे वेतनपथकाकडून वेतन देयकांना मंजुरी न देता सादर केलेले प्रस्ताव गहाळ झाल्याचे सांगून पुन्हा वारंवार प्रस्ताव मागितले जात आहेत. वेतन पथकातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे संस्थेच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व निवृत्त शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांना त्रास भोगावा लागत आहे.याउलट काही प्रशाळांची कामे झटपट होत असून काहींना रखडविले जात आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी लेखी मागणी पाटकर यांनी शिक्षण संचालकांकडे केली आहे. जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन पथकातील कर्मचाऱ्यांच्या कारभाराबाबत भंडारी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी माध्यमिक शिक्षण विभागाच्या संचालकांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. भंडारी एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेची मालवणात बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय आहे. या संस्थेचे व्यवहार पारदर्शक असून सर्व प्रकारच्या भ्रष्टाचारापासून संस्था दूर आहे. असे असताना कोणीही शासकीय कर्मचारी जर वेगळी अपेक्षा संस्थेकडून करत असेल तर सदर प्रकार शिक्षण विभागाच्या लक्षात आणून देणे आमचे कर्तव्य आहे. जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन पथकातील काही कर्मचारी संस्थेला जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. एखाद्या विषयाची परिपूर्तता केल्यावर प्रस्ताव पुन्हा मागवून घेणे, तो दिल्यावर पुन्हा तिसऱ्यांदा मागवून घेणे असे प्रकार कर्मचाऱ्यांकडून होत आहेत. काही ठराविक शाळांना उत्तम वागणूक दिली जात आहे आणि आमच्या शाळेला मिळणारी अशी वागणूक संस्थेने किती काळ सहन करावी ? असा सवाल विजय पाटकर यांनी उपस्थित केला आहे. माध्यमिक शिक्षण विभाग वेतन पथकातील काही कर्मचारी आपल्या कामामध्ये कमालीची बेफिकिरी आणि दप्तर दिरंगाई दाखवत आहेत. वेतन देयक व इतर कामांचे प्रस्ताव सादर करूनही प्रस्ताव परत पाठवा, प्रस्ताव सापडत नाही असे तोंडी निरोप पाठविले जातात. संस्थेने आजपर्यंत प्रस्तावांची त्रुटी पुर्तता करूनही तसेच थकीत वेतन देयक प्रस्ताव सादर करूनही सदर प्रस्ताव चार व पाच वर्षे झाली तरी वेतन पथकाकडून बिले खर्ची पडलेली नाहीत. ही गंभीर बाब आहे. तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांची अर्जित रजा रोखीकरणाची बिले कर्मचारी सेवानिवृत्त होऊन दोन ते तीन वर्षे झाल्यानंतरही आणि वेळोवेळी प्रस्तावांची त्रुटी पूर्तता करूनही त्याठिकाणी अद्याप खर्ची पडलेली नाही. एका शिक्षकाचे वरिष्ठ वेतनश्रेणी फरकाचे बिल डिसेंबर २०१९ मध्ये वेतन पथकाकडे सादर केल्यावर पथकाने ते आक्षेपार्ह म्हणून परत पाठविल्यावर संस्थेने पुन्हा मार्च २०२० मध्ये पुन्हा प्रस्ताव सादर केला. मात्र अद्यापपर्यंत वेतन पथकाकडून हा प्रस्ताव खर्ची घालण्यात आलेला नाही. तर संस्थेत सन २०१४- १५ व २०१५- १६ या वर्षात तासिका तत्वावर काम केलेल्या सी.एच.बी. शिक्षकांना आज पर्यंत वेतन मिळालेले नाही. याबाबतच्या प्रस्तावांची त्रुटी पूर्तता करूनही वेतन मिळालेले नाही. वेतन पथकातील कर्मचाऱ्यांच्या या प्रवृत्तीमुळे संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्रास भोगावा लागत आहे. वेतन पथकातील या कारभाराचा कसून शोध घेऊन योग्य ती पाऊले उचलावी अशी मागणी विजय पाटकर यांनी माध्यमिक शिक्षण संचालकांकडे केली आहे.
