कुडाळच्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची अखेर कार्यवाही

कुडाळ : कुडाळ शहराच्या पाणीटंचाईचा प्रश्न लक्षात घेऊन भंगसाळ नदीचे पाणी अडवण्यासाठी अखेर बंधाऱ्याच्या प्लेट्स बसविण्यात आल्या आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी प्रशासनाच्या संथ कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेत सात दिवसांत काम सुरू न झाल्यास लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर प्रशासनाने ही कार्यवाही केली आहे, असे मंदार शिरसाट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
बंधाऱ्याच्या प्लेट्स अनेक दिवसांपासून आणून ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, त्या बसवून पाणी अडविण्याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही होत नसल्याने नगरसेवक मंदार शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली होती. पाणीटंचाईचे संभाव्य संकट लक्षात घेता भंगसाळ नदीचे पाणी अडविणे आवश्यक असल्याचे त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांत निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरावरही पाणीटंचाईचे सावट आहे. त्यामुळे नदीचे पाणी अडवून त्याचा योग्य विनियोग करणे गरजेचे बनले होते. या प्रश्नावर शिरसाट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रशासनाला इशारा दिल्यानंतर पाटबंधारे विभागाने हालचाली करत बंधाऱ्याच्या प्लेट्स बसविल्या.
या कार्यवाहीमुळे भंगसाळ नदीतील पाणी अडविण्यास मदत होणार असून, शहराच्या पाणीपुरवठ्याला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच परिसरातील विहिरींची भूजलपातळी टिकवून ठेवण्यासही याचा फायदा होऊ शकतो. मंदार शिरसाट यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने कार्यवाही केल्याने या प्रश्नाकडे लक्ष वेधले गेले आहे.
