विद्यार्थ्यांच्या गुणदर्शन कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थ्यांना ८ हजार रुपयांचे बक्षीस..

⚡सावंतवाडी ता.२१-: जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, कोनशी येथे शनिवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी शारदोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. ज्ञानाची देवता श्री शारदादेवीचे आवाहन व पूजन, आरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद आणि विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांनी उत्सवाची रंगत वाढवली.
कार्यक्रमाची सुरुवात श्री शारदादेवीच्या आवाहन व पूजनाने करण्यात आली. त्यानंतर देवीची आरती व तीर्थप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. श्री माऊली देवी देवस्थान समिती, कोनशी यांच्या वतीने उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून आपल्या कला-गुणांचे प्रभावी सादरीकरण केले. नृत्य, गायन, नाट्यप्रयोग आणि विविध कलाविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या दशावतार सादरीकरणाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त दाद दिली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमांचे कौतुक करत कोनशी ग्रामस्थांनी त्यांना प्रोत्साहन म्हणून एकत्रितपणे ८,००० रुपयांचे रोख बक्षीस देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भरभरून दाद दिली.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री. अयप्पा हिरेमठ (केंद्रप्रमुख, तुळस) उपस्थित होते. तसेच कोनशी गावच्या सरपंच सौ. साधना शेट्ये, उपसरपंच श्री. अर्जुन सावंत, पोलीस पाटील सौ. नम्रता कोनशीकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सौरभ सिध्दये व उपाध्यक्ष श्री. सिध्देश गवस, ग्रामपंचायत सदस्य सौ. दिपाली गवस, मातृछाया प्रतिष्ठानचे श्री. बाबाजी सावंत आणि देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. गोरख गवस, श्री दुर्गाराम जोशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग व पंचायत समिती, सावंतवाडीच्या शिक्षण विभागामार्फत आयोजित ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ तांबुळी केंद्रस्तरीय चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा निकाल २०२६ मध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, कोनशीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले त्यामध्ये
चित्रकला स्पर्धेच्या इयत्ता पाचवी ते सातवी गटात कोनशी शाळेतील सानिका संतोष गवस( प्रथम क्रमांक), इयत्ता तिसरी ते चौथी गटात तीर्था निलेश बर्वे (तृतीय क्रमांक ),
वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवी गटात वेदांत निलेश बर्वे ( प्रथम क्रमांक), इयत्ता पहिली ते दुसरी गटात अथर्व धनंजय जोशी ( द्वितीय क्रमांक) तर इयत्ता तिसरी ते चौथी गटात तीर्था निलेश बर्वे हिने प्रथम क्रमांक मिळवला त्याबदद्ल सन्मानचिन्ह देऊन विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
या सत्कारामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले असून, त्यांच्या शैक्षणिक व कलात्मक प्रगतीसाठी प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. बाबुराव पास्ते यांनी केले. सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक डॉ. राजेंद्र चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपशिक्षिका सौ. स्वाती देसाई यांनी मानले.
भक्ती, संस्कृती आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा सुंदर संगम घडविणारा हा शारदोत्सव ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संस्मरणीय ठरला. अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच शाळा आणि समाज यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
