नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या पुढाकाराला लायन्स क्लब कुडाळ व नागरिकांचे सहकार्य:‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेला प्रारंभ..

⚡कुडाळ ता.२१-: भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवून उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने कुडाळ शहरात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या माध्यमातून तसेच लायन्स क्लब कुडाळ आणि ओंकार नगर येथील नागरिकांच्या विशेष सहकार्यातून ओंकार नगर येथे वनराई बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली. या उपक्रमामुळे कुडाळ शहरात विविध ठिकाणी बंधारे बांधण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे.
पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, भूजलसाठ्यात वाढ करणे आणि भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ओंकार नगर येथे स्थानिक नागरिक आणि लायन्स क्लब कुडाळच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत श्रमदानातून वनराई बंधारा उभारला. या उपक्रमामुळे जलसंधारणाच्या कामाला लोकसहभागाची जोड मिळाली आहे.
कुडाळ शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न लक्षात घेऊन आगामी काळात शहरातील विविध ठिकाणी अशाच प्रकारचे बंधारे उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. नागरिकांनी जलसंधारणाच्या अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.
या वेळी लायन्स क्लब कुडाळच्या अध्यक्षा स्नेहा नाईक, अस्मिता बांदेकर, शोभा नाईक, गुरुनाथ सावंत, पुंडलिक शिंदे, श्रेया सावंत, मधुकर कुंभार, केशव जाधव, सुधाकर पाटकर, सर्वेश पाटकर, सायमन रॉड्रिक्स, सतीश हुरलीकुप्पी, जनार्दन डीक्रूझ, अशोक पोईपकर, हरिश्चंद्र नेरूरकर, विनय पालकर, आनंद पाटकर यांच्यासह ओंकार नगरमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत असून, शहरातील जलसंधारणाच्या प्रयत्नांना यामुळे चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
