एकटाच समुद्र स्नान करीत असताना काळाचा घाला
मालवण दि प्रतिनिधी
तारकर्लीच्या समुद्रात समुद्रस्नानाचा आनंद लुटणाऱ्या जालना येथील सचिन एकनाथ जाधव ( रा. भिवपुर भोकरदन जि. जालना ) या बावीस वर्षीय पर्यटकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. सचिन याच्या मित्रमंडळींना समुद्र स्नान करून किनारा गाठल्यानंतर सचिन हा एकटाच समुद्रात स्नान करीत असताना ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जालना- औरंगाबाद येथील सहा तरुणांचा ग्रुप खासगी गाडीने पर्यटनासाठी आज मालवणात दाखल झाले होते. यामध्ये सचिन शिवाजी देठे, योगेश पुंडलिक दळवी, योगेश आत्माराम खिल्लारे, विनोद काकासाहेब खिल्लारे (सर्व राहणार औरंगाबाद – संभाजीनगर) व सचिन एकनाथ जाधव (रा. भिवपुर भोकरदन जि. जालना) यांचा समावेश होता. तर त्यांच्या सोबत गाडी चालक म्हणून रमेश एकनाथ काटकर हे होते. हे तरुण दुपारी तारकर्ली बीच वर मौज मजा व समुद्र स्नानाचा आनंद लुटण्यासाठी गेले. तारकर्ली एमटीडीसी केंद्रासमोरील किनाऱ्यावर खाणे पिणे व मौज मजा केल्यावर हे सर्वजण समुद्रात स्नान करण्यासाठी उतरले. काही काळ समुद्रात स्नान केल्यावर हे सर्वजण किनाऱ्यावर आले. मात्र यातील सचिन एकनाथ जाधव हा समुद्रात हात पाय धुवून येतो असे सांगून पुन्हा समुद्राच्या पाण्यात उतरला. यावेळी बाकीचे तरुण किनाऱ्यावर मौज मजा करत राहिले. मात्र काही वेळाने सचिन जाधव हा समुद्रात तसेच किनाऱ्यावर कुठेही दिसून येत नसल्याने त्याच्या मित्रांनी शोधाशोध सुरू केली. मात्र तो सापडून न आल्याने त्यांनी आरडाओरडा केला असता स्थानिक तरुणांनी त्याठिकाणी धाव घेतली. यावेळी स्थानिक तरुण वैभव सावंत व दशरथ चव्हाण व इतरांनी शोधाशोध केली असता त्यांना समुद्रात सचिन याचा मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यामुळे त्यांनी त्याठिकाणी धाव घेत मृतदेह बाहेर काढत किनाऱ्यावर आणला. सचिन याचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याचे समजताच त्याच्या मित्रमंडळींना मोठा धक्का बसला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील भानुदास येरागी, तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष सहदेव साळगावकर, पर्यटन व्यावसायिक मनोज खोबरेकर, संजय केळुसकर आदी व इतरांनी तारकर्ली किनाऱ्यावर धाव घेतली. याबाबत पोलिसांना माहिती दिल्यावर मालवणचे पोलीस निरीक्षक विजय यादव, सहायक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण, हेड कॉन्स्टेबल राजन पाटील, पोलीस श्री. ढोके आदी घटनास्थळी हजर झाले. यावेळी पोलिसांनी पर्यटक तरुणांकडून माहिती घेत पंचनामा केला. तसेच मृतदेह रुग्णवाहिकेतून मालवण ग्रामीण रुग्णालयात येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आला.
मृत सचिन जाधव याने बीएससी अग्रीकल्चर डिग्री पर्यंतचे शिक्षण घेतले होते. तसेच त्याचे सहकारी मित्रही उच्च शिक्षित आहेत. सचिन याच्या पश्चात आई वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
