शिवसेना माजी विभाग प्रमुख गुरुनाथ नाईक : ‘डबे वाजवा’ आंदोलनास पाठिंबा
⚡बांदा ता.०८-: अवैध दारू वाहतूक व्यवसायाविरोधात मनसेने पुकारलेल्या डबे वाजवा आंदोलनाला आमचा पाठींबा आहे. परंतु मनसे न्हावेली विभागप्रमुख मंदार नाईक यांनी याची सुरुवात प्रथम आपल्या विभागातून करावी. त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या परिसरात सध्या गोवा बनावटीची दारू विक्री, मटका, जुगार व अन्य अवैध व्यवसाय चालतात. अशा अवैध व्यवसायांचे उच्चाटन करण्यासाठी प्रथम आपल्या भागातूनच मंदार नाईक यांनी सुरूवात करावी असा टोला शिवसेना मळेवाड जिल्हा परिषद माजी विभागप्रमुख गुरुनाथ नाईक यांनी प्रसिद्धीपत्रकातून लगावला.
जिल्ह्यात चालू असलेल्या अवैध व्यवसायांविरोधात इन्सुली चेकपोस्ट येथे मनसेचे विभागप्रमुख मंदार नाईक यांनी डबे वाजवा आंदोलन पुकारले आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुनाथ नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकातून टोला लगावला. ते म्हणाले की, अवैध व्यवसायांना आमचा कायमच विरोध आहे. मनसेने जर पुढाकार घेऊन अशा गैरव्यवसाय विरोधातील मोहिम उभी केल्यास शिवसैनिकांचा व सर्व आरोस ग्रामस्थांचा सदैव पाठिंबा राहील. यापूर्वीही आम्ही अन्यायाविरोधात अनेकवेळा आवाज उठवला. आज सगळीकडे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असून अनेक लोक व्यसनाधीन होत आहेत, त्यांचे संसार बरबाद होत आहे. हे सर्व बंद करण्यासाठी मंदार नाईक यांनी प्रथम आपल्या विभागात सुरू असलेले अवैध व्यवसाय बंद करावेत असे गुरुनाथ नाईक यांनी पत्रकातून सांगितले.
