धारगळ येथे होवू घातलेल्या आयुष रुग्णालयात सिंधुदुर्गातील डॉक्टर, परिचारकाना संधी द्या

बांदा सरपंच अक्रम खान यांची मागणी;केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना दिले निवेदन

बांदा/प्रतिनिधी
गोव्यात धारगळ येथे आयुष मंत्रालयाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या भव्य रुग्णालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉक्टर, परिचारिका यांना सेवेत प्रधान्याने सामावून घ्यावे अशी मागणी बांदा सरपंच अक्रम खान यांनी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे केली आहे. त्यांनी याबाबतचे सविस्तर मागणीचे निवेदन मंत्री नाईक यांना दिले.
निवेदनात म्हटले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात वैद्यकीय व परिचारिकेचे शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी दरवर्षी बाहेर पडतात. महाराष्ट्र राज्यात गेली दहा वर्षे सातत्याने दहावी व बारावी बोर्डात कोकण बोर्ड हा अव्वल आहे. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैद्यकशास्त्रात नोकरीच्या संधी उपलब्ध नसल्याने हे विद्यार्थी वैद्यकीय सेवा देण्यापासून वंचित राहत आहेत.
सिंधुदुर्ग व गोवा यांचे नातेसंबंध असून ऋणानुबंध आहेत. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना प्रधान्याने रुग्णालयाच्या सेवेत सामावून घेण्यात यावे. घारपी येथे खासगी दौऱ्यावर आलेल्या मंत्री नाईक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी श्री स्वामी समर्थ मठाचे प्रमुख विजय गावकर, ग्रामस्थ, ज्ञानेश्वर सावंत, शैलेश लाड, रत्नाकर आगलावे, शरद सावंत, राजू खान, आपा आगलावे, मनोज सावंत, गुणेश गवस, शिवा गावकर, सिद्धेश परब, संतोष तारी, प्रसाद यादव आदिसह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री नाईक यांनी म्हणाले की, गोवा राज्य व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संबंध हे दृढत्वाचे आहेत. आतापर्यंत दोन्ही प्रातांनी नेहमीच एकमेकांना साथ दिली आहे. त्यामुळे आपल्या मागणीचा निश्चितच विचार करण्यात येईल.
फोटो :-
घारपी येथे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना निवेदन देताना सरपंच अक्रम खान. सोबत विजय गावकर, ज्ञानेश्वर सावंत व इतर. (छायाचित्र – निलेश मोरजकर)

You cannot copy content of this page