डोक्यात लोखंडाचा प्रहार करून जीवे मारण्याचा प्रयत्न
⚡कणकवली ता.०७-: कोळोशी वरचीवाडी येथे ओटववाडी येथील मच्छीविक्रेत्याला पहाटे ४:४५ च्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी डोक्यात लोखंडाचा प्रहार करून रक्तबंबाळ करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.मात्र लोकांनी मदतीला धाव घेताच मारेकरी पसार झाले.या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ओटववाडी येथील मच्छीविक्रेते लवू ओटवकर हे नेहमीप्रमाणे आपल्या घरून पहाटे ४:३० वाजता दुचाकीवरून शेजारील युवकासोबत कोळोशी वरचीवाडी येथील शंकर मंदिरासमोर देवगडला जाण्यासाठी वाट पहात उभे होते.दुचाकीचालक पुन्हा आपल्या घरी निघून जाताच निळ्या रंगाच्या सुमो गाडीतून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी लवू ओटवकर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.यापैकी एकाने ओटवकर यांच्या डोक्यात लोखंडाचा फटका मारून जखमी केले.मात्र आरडाओरडा ऐकून जवळच्या घरातील लोकांनी मदतीला धाव घेत असल्याचे लक्षात येताच मारेकरी पसार झाले.हि घटना आज शुक्रवारी पहाटे ४:४५ वाजण्याच्या सुमारास घडली.
पाळत ठेवून हल्ला
ओटवकर यांच्यावर हल्ला करणारे ज्या निळ्या रंगाच्या सुमो गाडीतून आले ती गाडी ते जेव्हा घरातून बाहेर पडले तेव्हा ओटववाडी बसथांब्यावर उभी होती.आणि पाठलाग करत कोळोशी वरचीवाडी येथे आले. शंकर मंदिरासमोर येऊन दुचाकीस्वार त्यांना सोडून परत जाताच ओटवकर एकटे असल्याचे पाहून हल्ला केला.
जीवे मारण्याचा प्रयत्न होता:लवू ओटवकर
याबाबत ओटवकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की,दबा धरून बसलेले मारेकरी हे कुठलातरी राग मनात ठेवून मला जीवे मारण्याच्या इराद्यनेच आले असावेत.मात्र नशीब बलवत्तर असल्यानेच आपण यामधून बचावल्याचे सांगितले.
मात्र या घटनेमुळे तसेच चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.तरी पोलीसांनी नांदगाव देवगड मार्गावर गस्त ठेवण्याची गरज आहे. याबाबतची तक्रार उशिरापर्यंत दाखल करण्यात आली नव्हती.
