⚡मालवण ता.०६-: ‘आधी तोरण गडाला मग माझ्या घराला’ या संकल्पनेतून दुर्गवीर प्रतिष्ठान, महाराष्ट्रच्या वतीने मालवण तालुक्यातील रामगड किल्यावर दसऱ्याच्या मुहूर्तावर विजयदुर्गोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गडावर गडपुजन, गणेश पूजन, तसेच शस्त्रपूजन करण्यात आले.
यानिमित्त दुर्गवीरांनी सकाळी लवकर येऊन गडावर पूर्व तयारीला सुरुवात केली. यावेळी ग्रामस्थांनीही उपस्थिती दर्शवत दुर्गवीरांसोबत गडावरील पूर्वतयारीस सहकार्य केले. यावेळी फुलांचा माळा, पारंपरिक नव्याची तोरणं, पताका यांच्या साहाय्याने गडाची प्रवेशद्वारे सजविण्यात आली. गडांच्या दोन्ही द्वारांवर गडपूजन करून पुढे ग्रामस्थांच्या हस्ते गडावर असलेल्या प्राचीन गणेश मूर्तीचे, तुळशी वृंदावनाचे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आरती करून गारद देऊन शस्त्र पूजन करण्यासाठी सर्वजण गडावर असलेल्या तोफांजवळ पोहचले. वर्षभर गडकिल्ल्यांच्या सेवेसाठी तयार असणाऱ्या तसेच ज्याच्यामुळे गडसंवर्धनाचे काम दुर्गवीर करू शकतात त्या अवजारे आणि हत्यारांचे विजयादशमी निमित्त पूजन व औक्षण करण्यात आले. शेवटी प्रसाद वाटप करून महाराजांच्या जयघोषात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी रामगड सरपंच श्री. विलास घाडीगांवकर, भालचंद्र पवार, अमिताज तारकर, दीपक कामतेकर, नरेश कामतेकर, शुभम मठकर,तुषार साळसकर यांसह अनेक स्थानिक ग्रामस्थ आणि शिवप्रेमी उपस्थित होते. या उत्सवासाठी मिलिंद चव्हाण,संकेत परब, चैतन्य आरेकर, राज मालोंडकर, चेतन घोणे, तुषार चव्हाण, सुबोध चव्हाण, गणेश मालंडकर, प्रथमेश वरवडेकर,ओंकार पालव, प्रणय चव्हाण, मंदार शेट्ये, सहना प्रभुदेसाई, सायली आचरेकर,वैभव वाघाटे, धनंजय सावंत, विनायक गुरव, मिलिंद नाईक, तुषार नार्वेकर, रोहित कडू, कपिल मेस्त्री, केतन मेस्त्री आदि दुर्गवीरांनी मेहनत घेतली.
