नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांचा आरोप
देवगड
देवगड जामसडे नगरपंचायतीचे भाजप गटनेते शरद ठुकरूल यांनी स्वच्छ सर्वेक्षण २०२२ चा निकाल जाहीर करून देवगड जामसडे नगरपंचायतीची स्वच्छ सर्वेक्षणात पीछेहाट झाली अशी बातमी दिली आहे. ही बातमी म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी नसून विरोधी पक्षाच्या भाजप सदस्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे.अशी प्रतिक्रिया देवगड जामसंडे नगरपंचायत नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
यात नमूद केलेप्रमाणे बातमी देण्यापूर्वी श्री ठुकरुल यांनी स्वच्छ सर्वेक्षण २०२२ चा निकाल कोणाच्या काळातील आहे हे पाहिले असते तर विद्यमान सत्ताधारी यांच्या काळातील नाही हे त्यांच्या लक्षात आले असते.परंतु ते त्यांनी पाहिलेले नाही तसेच देवगड जामसंडे नगरपंचायत स्वच्छ सर्वेक्षण २०१९ ला महाराष्ट्र (वेस्टन झोन )मध्ये ८१ वा नंबर २०२० ला ११४ वा नंबर व २०२१ ला १४८ आणि आता २०२२ ला २१८ नंबर पर्यंत घसरण काय झाली याचा अभ्यास ही ठुकरुल यांनी करावा.
स्वच्छ सर्वेक्षण २०२२ चा निकाल हा जुलै २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीचा आहे. या कालावधीत देवगड जामसंडे नगरपंचायत मध्ये सत्ता भाजपची होती. त्या काळातील नगरपंचायत मधील सर्व कारभार जनतेने जवळून पाहिलेला होता. म्हणून जनतेने जानेवारी २०२२ च्या निकालाने भाजपला नाकारून देवगड जामसंडे नगरपंचायतीची सत्ता शिवसेनेकडे दिली आहे .त्यामुळे देवगडजामसंडे या नगरपंचायतची दयनीय अवस्था पीछेहाट कोणी केली हे शरद ठुकरुल यांनी झोन बँकिंग व स्टेट रँकिंग यांचा निकाल जाहीर करून उदाहरणासहित पटवून दिले आहे. आणि हा अहवाल सत्ताधारी यांचे काळातील असल्याचे भासवून जनतेची दिशाभूल करीत आहेत असा आरोपही नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी केला आहे..
