⚡मालवण ता.०४-: मालवण तालुका भंडारी ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्था मालवणची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा लीलांजली हॉल येथे संपन्न झाली. यावेळी संस्थेच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव करण्यात आला तसेच ज्येष्ठ सभासद व सभांना सातत्याने उपस्थित राहणाऱ्या सभासदांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
या सभेस संस्थेचे चेअरमन अनुपस्थित राहिल्याने संस्थेचे ज्येष्ठ संस्थापक व संचालक सुनील नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. यावेळी संस्थेचे संचालक भिकाजी दुदवडकर, राजीव आचरेकर, ऍड. हेमेन्द्र गोवेकर, सागर हडकर, सुरेश चव्हाण, सौ. रसिका रवींद्र तळाशीलकर, शुभदा करंगुटकर, सभासद देवदत्त हडकर, सचिन गवंडे, अजित गवंडे, चंद्रशेखर वाईरकर, सचिन आरोलकर व इतर सभासद उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण मयेकर यांनी अहवालाचे वाचन करून संस्थेच्या कामकाजाची माहिती दिली. तर कर्मचारी चेतन हडकर, विनोद बिलये, अश्विनी वायंगणकर यांनी सभेचे कामकाज सुरळीत चालण्यास मदत केली.
या सभेत संस्थेचा आर्थिक वर्षातील १२ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. गेली तीन वर्षे ही संस्था १२ टक्के लाभांश देत असून सभासदांचा आर्थिक फायदा होत आहे. संस्थेची वाटचाल प्रगतीपथावर असल्याचे पाहून यावेळी सभासदांनी समाधान व्यक्त केले. तर सभा अध्यक्ष सुनील नाईक यांनी संस्थेच्या प्रगतीचा व भविष्यातील वाटचालीचा आढावा घेतानाच भविष्यात संस्था जास्त लाभांश देईल, अशी ग्वाही दिली. भविष्यात १५ टक्के लाभांश देण्यासाठी सर्व संचालक मंडळाने प्रयत्न करून सभासदांनीही सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. तसेच संस्थेचे ज्येष्ठ सभासद श्रीनिवास हडकर, अंकुश करलकर यांचा तसेच संस्थेच्या वार्षिक सभेस गेली दहा वर्षे सातत्याने उपस्थित राहणारे सभासद अरविंद सराफ, नंदन देसाई यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
