⚡कणकवली ता.०४-: फोंडाघाटाच्या पायथ्यापासून काही अंतरावर,पिंपळवाडी येथील एका वळणावर, अवजड ट्रकचा पुढील व्हील एक्सल तुटल्याने आणि टर्न न बसल्याने, लगतच्या शेतात उलटल्याने सकाळी 9 च्या सुमारास अपघात झाला.
ट्रकमध्ये सिमेंट भरलेले असून, तो कोल्हापूरहून कणकवलीमार्गे गोव्याकडे जात होता. ट्रकचे अतोनात नुकसान झाले आहे. ट्रक पलटी झाल्यावर सिमेंटच्या बॅगा लगतच्या शेतात विखुरल्या असून, टाकीतून डिझेल वाहत होते. ड्रायव्हरच्या डोक्याला जखमा झाल्या असून प्रथम दर्शनीनी त्याला चेकपोस्ट पर्यंत पोहोचविले. तेथील पोलीस कॉन्स्टेबलने त्याला डॉक्टरकडे प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठी रिक्षा करून दिली.
आयटीआय ते साईमंदिर आणि चेकपोस्ट ते घाट रस्त्यावर खड्डे पडले असून वाहन चालकाला कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. त्यामुळे त्यांना मानसिक आणि शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच क्लीनर शिवाय येणाऱ्या मोठ्या अवजड ट्रक वाहनांना अपघातास सामोरे जावे लागते आहे. आज झालेला अपघात,मोठ्या खड्ड्यामुळे, पॉवर व्हीलर एक्सेल तुटल्याने झाल्याने हा “खड्ड्याचा अपघात” असल्याची चर्चा आहे. त्यामुळे रस्ते विभागाने गांभीर्याने लक्ष घालून रस्ता पूर्ववत वाहतुकीसाठी सुसह्य करावा, आणि संभाव्य अपघात- हानी आणि जनक्षोभ टाळावा अशी आग्रही मागणी ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे
