सावंतवाडी,ता.०४: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आयोजित १९ वर्षाखालील मुलांच्या विनू मंकड क्रिकेट स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू व जलदगती गोलंदाज प्रथमेश पुंडलिक गावडे याची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा ७ ऑक्टोबरपासून गुडगाव-हरियाणा येथे होणार आहे.
सावंतवाडी तालुक्यातील आंबोली सतीचीवाडी येथील रहिवासी असलेल्या प्रथमेशने आपल्या अप्रतिम गोलंदाजीने निवड समितीचे लक्ष आपल्याकडे वेधले होते. पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित निमंत्रितांच्या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधित्व करीत असताना पाच सामन्यांमध्ये त्याने तब्बल ३८ बळी टिपले होते. यातील एका सामन्यात त्याने एकाच डावात ९ बळी मिळविले होते.
