सीईओ प्रजित नायर, बांदा येथे झाले जल्लोषी स्वागत
बांदा ता.०३-:
स्वच्छता क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २, स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ अंतर्गत जिल्हा परिषद सिंधुदुर्गला पश्चिम भारतात दुसरा तर राज्यात पहिला क्रमांक प्राप्त झाला आहे. हे सर्वस्वी जिल्हावासियांमुळे शक्य झाले आहे असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी येथे केले. दिल्ली येथे पुरस्कार स्विकारल्यानंतर बांदा शहरात श्री नायर व सर्व जिल्हा परिषद टीमचे भव्य रॅली काढून ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
पुरस्काराची माहिती देण्यासाठी बांदा ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री नायर बोलत होते. २ ऑक्टोबर रोजी विज्ञान भवन, दिल्ली येथे पार पडलेल्या कार्यक्रमात केंद्रिय ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री गिरिराज सिंग, केंद्रिय जलशक्ती मंत्री गजेद्रसिंग शेखावत, केंद्रिय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल, केंद्रिय सचिव स्वच्छता मंत्रालय श्रीमती विनी महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) विनायक ठाकुर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पत्रकार परिषदेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य ) राजेंद्र पराडकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी , (ग्रामीण) विशाल तनपुरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) विनायक ठाकुर, सावंतवाडीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, माजी सभापती सावी लोके, शर्वणी गावकर, जिल्हा जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, सरपंच अक्रम खान, माजी सभापती शीतल राऊळ, ग्रामविस्तार अधिकारी लीना मोर्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रजित नायर म्हणाले कि, स्वच्छ भारत मिशन ( ग्रा ) टप्पा २ अंतर्गत पेयजल व स्वच्छता विभाग , जलशक्ती मंत्रालय , नवी दिल्ली यांच्या सुचनेनुसार सन २०२१-२२ या वर्षात राज्यातील ग्रामिण भागात स्वच्छ सर्वेक्षण सुरु करण्यात आले होते. सदर सर्वेक्षण देशातील १७४५० गावे व ६९८ जिल्ह्यात केंद्र स्तरावरुन नेमण्यात आलेल्या संस्थेमार्फत तपासणी करण्यात आली होती. यावेळी देशातील शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, धार्मिक स्थळे, बाजाराची ठिकाणे यांची पडताळणी संस्थेमार्फत करण्यात आली होती. या सर्वेक्षणात सर्व्हिस लेव्हल प्रोग्रेस, थेट निरिक्षण, तर नागरिकांचा प्रतिसाद यावर स्वच्छ सर्वेक्षण ग्रामिण चे मुल्याकन करण्यात आले. तसेच स्वच्छ भारत मिशन (ग्रा) च्या संकेतस्थळावर विविध घटकांची प्रगती, नागरिकांचे प्रतिसाद, सार्वजनिक व संस्थांत्मक ठिकाणची स्वच्छ्ता, १५ वा वित्त आयोगात घेण्यात आलेली स्वच्छतेची कामे, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत करण्यात आलेली कामे यांचे मुल्यमापन करण्यात आले होते. या मुल्यमापनामध्ये अव्वल राहिल्यानेच स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ मध्ये जिल्ह्याला पश्चिम भारतात दुसरा तर महाराष्ट्रात पहिला क्रमांक प्राप्त झाला आहे.
आपला जिल्हा हा स्वच्छता प्रिय जिल्हा असुन जिल्हा वासियांना स्वच्छतेची सवय आहे. केंद्र किंवा राज्य शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रमांत जिल्हावासिय सहभाग घेतात. यामुळेच जिल्ह्याला स्वच्छता क्षेत्रात आतापर्यत विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. याचे सर्वस्वी श्रेय जिल्हावासियांना तसेच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी , पदाधिकारी, सरपंच, अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, शिक्षक, गटसंसाधन केंद्र पाणी व स्वच्छता यांना जाते. असेही श्री नायर यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘हर घर जल’ हे अभियान प्रशासकीय पातळीवर राबविण्यात येणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ६८२ गाव या अंतर्गत घेण्यात आले आहेत. लोकांच्या उत्तम सहकार्यामुळे ७४१ गावे हागनदारीमुक्त करण्यात आली आहे. संपूर्ण देशात प्रथम क्रमांक काही निकशांनी हुकला. मात्र पुढच्या वर्षी याचे आत्मपरीक्षण करून निश्चितच पहिला क्रमांक मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्ह्यातील विविध शासकीय, निमशासकीय संघटनानी प्रजित नायर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी कट्टा कॉर्नर चौकात रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. संपूर्ण बांदा शहरात रॅली काढण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजेश विरनोडकर, बाळू सावंत, मकरंद तोरसकर, साई काणेकर, सदस्या स्वप्नाली पवार, किशोरी बांदेकर, रिया आलमेडा, तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, शिक्षण विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, केंद्रप्रमुख संदीप गवस यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो :-
बांदा येथे पत्रकार परिषदेत बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर. सोबत संजना सावंत, अक्रम खान व इतर.
फोटो :-
बांदा येथे विजयी रॅलीत सहभागी झालेले प्रजित नायर व इतर.
