निमजगा शाळेत पालकांची सखोल चौकशीची केली मागणी
बांदा/प्रतिनिधी
चॉकलेटचे आमिष दाखवून शाळकरी विद्यार्थ्याचा अपहरणाचा प्रयत्न विद्यार्थ्याने संशयितच्या हाताचा चावा घेऊन हाणून पाडल्याने या विद्यार्थ्याच्या धाडसाचे आज बांदा निमजगा प्राथमिक शाळेत पालकांनी कौतुक केले. एवढा गंभीर प्रकार घडूनही शालेय प्रशासनाचा एकही अधिकारी याठिकाणी फिरकला नसल्याने पालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. यासंदर्भात पोलिसांना निवेदन देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समिती व पालकांच्या बैठकीत घेण्यात आला.
काल सकाळी बांदा दाणोली रस्त्यावर निमजगा प्राथमिक शाळेत तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा दुचाकीवरून आलेल्या इसमानी अपहरणाचा प्रयत्न केला. या घटनेमुळे बांदा शहरात एकच खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर शाळा व्यवस्थापन समितीने पालकांच्या सभेचे आयोजन केले होते. बैठकीला व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप बांदेकर, सरपंच अक्रम खान उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थ्याबाबत एवढी गंभीर घटना घडूनही केंद्रप्रमुख किंवा, विस्तार अधिकारी यांनी शाळेत येऊन चौकशी करण्याचे देखील सौजन्य न दाखवील्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी फोनवरून सरपंच अक्रम खान व अध्यक्ष श्री बांदेकर यांनी विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर यांना जाब विचारला. तसेच यासंदर्भात सोमवार दिनांक ३ रोजी शाळेत बैठकीचे आयोजन करण्यात आले असून त्यावेळी उपस्थित राहण्याची ताकीद देण्यात आली.
गतवर्षी शाळेत चोरीची घटना तसेच मुलाच्या अपहरणाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या आवारात सिसिटीव्ही बसविण्याची मागणी करण्यात आली. ग्रामपंचायत निधीतून कॅमेरा बसविण्याचे आश्वासन सरपंच खान यांनी यावेळी दिले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी बांदा पोलीस ठाण्याला पत्र देण्याबाबत ठराव घेण्यात आला. यावेळी मुलाच्या धाडसाचे कौतुक करण्यासाठी पालक गिरीश भोगले यांनी सर्वांच्या वतीने पुष्पगुच्छ व शालेय साहित्य देऊन गौरव केला.
यावेळी पालक ज्ञानेश्वर सावंत, समिती सदस्य शिवराम बहिरे, दीपक नाईक, शैलेश शेटकर, रुपेश कानसे, शरद सावंत, रामदास सावंत, शैलेश तांडेल, शेखर तांडेल, अवधूत च्यारी, मुख्याध्यापिका प्राजक्ता राऊळ, शिक्षक मालू लांबर, सुवर्णा भाईप, मंगल दराडे, लुवीजा गोंसावलीस आदी उपस्थित होते.
फोटो :-
बांदा निमजगा शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक करताना पालक. (छायाचित्र – निलेश मोरजकर)
