१२० ठिकाणी सार्वजनिक तर ३२ ठिकाणी खाजगी दुर्गामातेची प्रतिष्ठापणा
ओरोस ता.२७-:
जिल्ह्यात कालपासून मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. जिल्ह्यात १२० ठिकाणी सार्वजनिक तर ३२ ठिकाणी खाजगी दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करण्यात आली. दुर्गामातेचे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करीत प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजपासून रात जागर सुरू झाला असून दांडिया, गरबा यासह विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे यानिमित्त जिल्ह्यात सार्वजनिक मंडळातर्फे आयोजन करण्यात आले आहे.
गतवर्षी कोरोनामुळे नवरात्रोत्सव साजरा होवू शकला नव्हता. दुर्गा मातेची प्रतिष्ठापणा करण्यात आली होती. परंतु गर्दी करण्यास मनाई असल्याने धार्मिक, सांस्कृतिक, करमणूक कार्यक्रम होवू शकले नव्हते. त्यामुळे यावर्षी नवरात्रोत्सव डबल उत्साहात साजरा केला जात आहे. हा उत्सव धूम धडाक्यात व शांततेत पार पडावा यादृष्टीने जिल्हा पोलीस प्रशासन यंत्रणेने आवश्यक त्या उपाययोजना आखल्या आहेत. आज सोमवार २६ सप्टेंबर घटस्थापने पासून विधिवत नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला. यानिमित्त सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळे, तसेच विविध मंदीरे तसेच खाजगी घरांमध्ये दुर्गा देवीची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे कालपासून यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाले असून भजन, फुगड्या, रास दांडिया, नृत्य, रासक्रीडा, वेशभूषा स्पर्धात्मक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे काल पासून नऊ रात्री आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षी शासनाने नवरात्र उत्सवासाठी कोणतीही बंधने ठेवलेली नाहीत. त्यामुळे गणेशोत्सवानंतर आता नवरात्र उत्सवाची धूम यावर्षी चांगलीच रंगणार असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात १२० ठिकाणी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळातर्फे दुर्गादेवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यामध्ये दोडामार्ग ८, बांदा ८, सावंतवाडी १५, कुडाळ १४, वेंगुर्ले १०, निवती ५, सिंधुदुर्गनगरी ४, मालवण १४ आचरा ४, देवगड १०, विजयदुर्ग ६, कणकवली १३, वैभववाडी ९ अशाप्रकारे पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात ही प्रतिष्ठापणा झाली आहे. याशिवाय जिल्ह्यात दोडामार्ग ४, वेंगुर्ले ४, कुडाळ २, मालवण ६ विजयदुर्ग १, सिंधुदुर्गनगरी १, देवगड ८, सावंतवाडी ६ आदी ३२ ठिकाणी दुर्गादेवीची खाजगीरित्या स्थापना करण्यात आली आहे.
