⚡बांदा ता.२३-: हिंदी भाषा ही संपर्क भाषा म्हणून कार्य करते. राजभाषा हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळवण्याइतपत समर्थ असून, हिंदी राष्ट्रभाषेचा सन्मान ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे वक्तव्य मुंबई पोर्ट ट्रस्टचे लेखाधिकारी प्रशांत नाईक यांनी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे केले.
याठिकाणी आयोजित हिंदी दिनाच्या कार्यक्रमात उद्घाटक या नात्याने श्री. प्रशांत नाईक बोलत होते. यावेळी हिंदी दिनाची माहिती देत असताना भारतीय संविधानाची आणि संविधानातील तरतुदी आणि संविधानामध्ये भाषेबद्दल असणाऱ्या कलमांचा उल्लेख यावेळी श्री. नाईक यांनी केला.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी या नात्याने मालवण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी हिंदी भाषेबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना, संपर्क भाषा म्हणून हिंदीचे देशामधील स्थान किती महत्त्वाचे आहे. याबद्दल उपस्थित विद्यार्थ्यांना उदबोधन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील नाईक यांच्या हस्ते गटशिक्षणाधिकारी संजय माने यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तर व्यासपीठावर उपस्थित विशेष अतिथी बँक ऑफ महाराष्ट्रच्या श्रीमती दुर्गाकणी यांचा सत्कार संस्थेच्या सचिव श्रीमती देसाई यांनी केला. स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कट्टा चे अमोल चव्हाण यांचा सत्कार स्कूल कमिटी अध्यक्ष सुधीर वराडकर यांनी केला. कार्यक्रमाचे उद्घाटक प्रशांत नाईक यांचा सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक संजय नाईक यांनी केला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित स्कूल कमिटी अध्यक्ष कट्टा नंबर १ गणेश वाईरकर, श्री पावसकर यांचाही हिंदी विभागातर्फे पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
मुख्याध्यापक श्री नाईक यांनी प्रशालेमध्ये चाललेल्या हिंदी विभागाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिंदीचे कार्य करणारी आपली एकमेव शाळा असून निश्चितच हे आपल्यासाठी गौरवाची बाब आहे असे सांगितले. आपल्या प्रशालेतील हिंदी विभाग प्रमुख बी एम वाजंत्री तसेच आर ए सावंत, जे एन कानूरकर या सर्व सदस्यांना प्रोत्साहन दिले. सुनील नाईक यांनी आपल्या मनोगतामध्ये सर्वाना शुभेच्छा दिल्या व हिंदी उपक्रमा बद्दल गौरवद्वार काढले. हिंदी अध्यापक समिती मार्फत घेण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल व विद्यार्थी गुणवत्ता विकासाच्या चाललेल्या प्रयत्नाबद्दल समाधान व्यक्त केले. उपक्रमातून मिळणाऱ्या ज्ञानाची विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात सकारात्मकता आणावी असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एम वाजंत्री केले. आभार आर ए सावंत यांनी मानले.
राष्ट्रभाषेचा सन्मान ही प्रत्येकाची जबाबदारी- प्रशांत नाईक
