श्री देवी माऊली नवरात्रोत्सव मंडळ तळवणेच्यावतीने आयोजन
⚡सावंतवाडी ता.२३सहदेव राऊळ -: तळवणे येथील श्री देवी माऊली नवरात्रोत्सव मंडळाच्यावतीने खास नवरात्रोत्सवानिमित्त तळवणे माऊली मंदिर येथे २६ सप्टेंबर रोजी एक गाव एक मंडळ भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
प्रत्येक गावातील भजनी कलाकार नावारुपास यावेत. गावातील एकता वाढावी. व गावातील कलाकारांचे कलागुण स्पर्धेत दिसावेत या हेतुने ही स्पर्धा आयोजित केली आहे. भजनाचा कालावधी ३५ मिनीटांचा असणार आहे.
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक ५०००/-, द्वितीय ३०००/-, तृतीय २०००/- व प्रत्येकी सन्मान चिन्ह प्रदान केले जाणार आहे. स्पर्धेत उत्कृष्ट गायक, पखवाज, तबला, झांज, कोरस, शिस्तबद्ध मंडळ अशी बक्षिसेही दिली जाणार आहे. तसेच उत्कृष्ट प्रार्थना, उत्कृष्ट जय जय राम, उत्कृष्ट रुपक, उत्कृष्ट गजर, उत्कृष्ट अभंग, उत्कृष्ट गौळण, उत्कृष्ट ज्ञानेश्वर माऊली गजर अशी प्रत्येक गायनासाठीही बक्षिसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेत २६रोजी रात्री ७.३०वाजता गुरुकृपा भजन मंडळ मठवाडी तळवणे (बुवा-श्री. सागर गावडे), रात्री ८.१०वाजता जय गणेश भजन मंडळ सुतारवाडी, तळवणे (बुवा – नितीन मेस्त्री), रात्री .८.५० वाजता श्री देव राष्ट्रोळी प्रासादीक भजन मंडळ, नेतर्डे (बुवा- भानुदास गवस), रात्री ९.३० वाजता स्वराभिषेक भजन मंडळ, साटेली (बुवा-श्री. सत्यनारायण कळंगुटकर), रात्री १०.१०वाजता महापुरुष प्रासादीक भजन मंडळ, पिंगुळी (बुवा – प्रसाद आमडोसकर), रात्री १०.५०वाजता रवळनाथ प्रासादीक भजन मंडळ, पिंगुळी (बुवा – रूपेश यमकर), रात्री ११.३०वाजता श्री रवळनाथ प्रासादीक भजन मंडळ, पाडलोस (बुवा – अजित गावडे), रात्री १२.०५वाजता श्री ब्राह्मणदेव प्रासादीक भजन मंडळ, मळेवाड (बुवा- दिनेश मुळीक), रात्री १२.४० वाजता
श्री देव ईस्वटी प्रासादीक भजन मंडळ, मातोंड (बुवा- सुधिर परब) आदी भजन मंडळांची भजने सादर होणार आहेत. रात्री १.२० वाजता स्पर्धेचा निकाल जाहिर केला जाणार आहे. तरी भजन रसिकांनी या स्पर्धेचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देवी माऊली नवरात्रोत्सव मंडळ तळवणेच्यावतीने करण्यात आले आहे.
