परराज्यातील बोटी आणून अनधिकृत जलक्रीडा व्यवसाय

जलक्रीडा व्यावसायिक संघटना आक्रमक;उद्या बंदर विभागात धडक देत घालणार घेराव

मालवण दि प्रतिनिधी
मालवण बंदर जेटीच्या हद्दीत इतर राज्यातील बोटी आणून बंदर विभागाच्या डोळ्यादेखत अनधिकृत जलक्रीडा व्यवसाय केला जात असल्याने व याबाबत मालवण बंदर विभाग कोणतीही कारवाई करत नसल्याने संतप्त बनलेल्या जलक्रीडा पर्यटन व्यावसायिक संघटना मालवणचे शहर अध्यक्ष राजेंद्र परुळेकर, तालुका उपाध्यक्षा अन्वेशा आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली जलक्रीडा व्यावसायिकांनी मालवणचे तहसीलदार, पोलीस आणि बंदर विभागाला निवेदन देत परराज्यातील जलक्रीडेसाठी बोटी आणणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

दरम्यान या प्रश्नी कारवाई न झाल्यास शुक्रवारी सकाळी मालवण बंदर कार्यालयावर पर्यटन व्यावसायिक धडक देत अधिकाऱ्यांना घेराव घालतील. प्रसंगी बंदर विभागाच्या मालवण कार्यालयाला टाळे ठोकतील असा इशारा जलक्रीडा व्यावसायिकांनी दिला आहे.

मालवण बंदरामध्ये इतर राज्यातील बोटी आणून व्यवसाय केला जात आहे. त्या व्यवसायांवर मालवण बंदर विभागाकडून कोणतीही कार्यवाही केली जात नाही. अनधिकृत व्यवसायिक कमी दर देऊन व्यवसाय करत आहेत त्यामुळे आम्हा अधिकृत व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. अनधिकृत जलक्रीडा व्यवसाय करताना त्यांना कोणतेच कागदपत्रे करावे लागत नाही. आम्ही अधिकृत व्यवसायिक मात्र सर्व विभागांचे कागदपत्रे पूर्ण करुन व्यवसाय करत आहोत. जे अनधिकृत व्यवसायिक आहेत त्यांच्याकडे ज्या बोटी आहेत त्या बोटीना नंबर, सर्व्हे नाही या बोटी महाराष्ट्र राज्यास नोंदणी झालेल्या नाहीत. या बोटीतून अपघात घडला तर याला जबाबदार कोण असेल?

आम्ही व्यवसाय करण्यासाठी बँकेचे मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलेले आहे. या अनधिकृत प्रकारामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होऊन बँकेचे कर्ज फेडणे कठीण होत आहे.

सर्व अनधिकृत व्यवसाय महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मालवण ऑफिसच्या समोर चालू आहे. आम्ही अधिकृत व्यवसायिक वारंवार त्या अनधिकृत व्यवसायावर कारवाईसाठी मागणी करतो मात्र आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. बंदर विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. तरी जलक्रीडा व्यवसायाबाबत ज्या समस्या आहेत त्या समस्या आपण जाणून घ्याव्यात व अनधिकृत व्यवसायांवर योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी पर्यटन महासंघ सिंधुदुर्ग मालवण शहर अध्यक्ष राजेंद्र परुळेकर यांनी मालवण तहसीलदार, पोलीस निरीक्षक, बंदर विभाग यांना दिले असून जिल्हाधिकारी यांनाही याबाबत व्यावसायिकांनी माहिती दिली आहे.

याबाबत मालवण बंदर विभागाकडून कारवाई न झाल्यास शुक्रवारी सकाळी मालवण बंदर अधिकाऱ्यांना घेराव घालून आंदोलन केले जाईल. प्रसंगी बंदर विभागाच्या मालवण कार्यालयाला टाळे ठोकू. असा इशारा जलक्रीडा व्यावसायिकांनी बंदर विभागाचे कॅप्टन भुजबळ यांना देण्यात आला आहे.

You cannot copy content of this page