जमीन मालकांनी सी वल्डसाठी भूसंपादन करण्याची केली मागणी

उपजिल्हाधिकारी वर्षा शिंगण यांना दिले निवेदन;पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांची माहिती

मालवण (प्रतिनिधी)
वायंगणी तोंडवळी येथील रखडलेला जागतिक दर्जाचा सिवर्ल्ड प्रकल्प होण्यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघाने प्रयत्न सुरू केले असून याचा एक भाग म्हणून महासंघाच्या माध्यमातून प्रकल्प क्षेत्रातील जमीन मालकांनी उपजिल्हाधिकारी वर्षा शिंगण- पाटील यांची भेट घेऊन सिवर्ल्ड प्रकल्पासाठी भू संपादन प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे, अशी माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू उर्फ बाबा मोंडकर यांनी दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून घोषित होऊन दोन दशकांपेक्षा जास्त काळ होऊन गेला असूनही पर्यटनाच्या माध्यमातून शाश्वत पर्यटन वाढीसाठी म्हणावे तसे प्रयत्न झाले नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाच्या माध्यमातून व्यवसाय व रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. मात्र शासन स्तरावर या दिशेने काम होण्याची गरज आहे. पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या माध्यमातून बारमाही पर्यटन वाढीसाठी आवश्यक असलेला आतंराष्ट्रीय प्रकल्पापैकी एक असलेल्या सिवर्ल्ड प्रकल्प ३५० एकर क्षेत्रात होण्यासाठी प्रयत्न चालू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा उपजिल्हाधिकारी वर्षा शिंगण-पाटील, भूसंपादन यांची तोंडवळी- वायंगणी येथील जमीन मालकांसोबत भेट घेऊन सिवर्ल्ड भूसंपादन प्रक्रिया सुरु करण्याबाबत मागणी करण्यात आली. जमीन मालकांच्या माध्यमातून उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

जमीन मालकांनी दिलेल्या निवेदनानुसार आम्ही तोंडवळी वायंगणी येथील जमीन मालक असून आमची स्वसंपांदित वडिलोपार्जित जमिनी असून सदर जमिनी शासनाने जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी ठरविलेल्या सीवल्ड प्रकल्पासाठी देण्यास तयार आहोत. तसेच या विषय संदर्भात माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यतेखाली मंत्रालय मुंबई येथे जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी श्री.पांढरपट्टे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये सदर प्रकल्प भूसंपादन प्रक्रिया संदर्भात आदेश झाले असून तीन वर्षे होऊनही प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रिया प्रलंबित आहे. या विषयी आपल्या स्तरावर भूसंपादन प्रक्रिया चालू करण्याचे आदेश व्हावेत, अशी मागणी जमीन मालकांनी केली आहे. तसेच या प्रलंबित प्रकल्पाविषयी आवश्यक त्या पर्यटन विभाग व शासन वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे सदर प्रकल्पामुळे पर्यटन क्षेत्रात व्यवसाय व रोजगार क्षेत्रात जिल्हा राज्यात अग्रेसर होऊ शकतो, असे पर्यटन महासंघाचे अध्यक्ष विष्णु उर्फ बाबा मोंडकर यांनी सांगत प्रकल्पाची आवश्यकता स्पष्ट केली. यावर बोलताना उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांनी सदर जमीन मालकांच्या मागणी विषयी शासन स्तरावर मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी जमीन मालक हनुमंत प्रभू, आनंद जामसंडेकर, श्रीकांत गिरकर, आत्माराम कुमठेकर तसेच पर्यटन व्यवसाययिक महासंघ पदाधिकारी नकुल पार्सेकर, मंगेश जावकर, किशोर दाभोलकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page