तीन कोटींचा निधी होणार खर्च
आ वैभव नाईक
मालवण दि प्रतिनिधी
मालवण येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग येथील जेटीवर सुमारे ३ कोटी रुपये खर्चून पर्यटकांसाठी निवारा शेड उभारण्यात येणार आहे. या कामास लवकरच सुरवात होणार आहे. त्याचबरोबर शिवराजेश्वर मंदिरात सिंहासन बसविण्याची कार्यवाहीही लवकरच होईल अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी येथे दिली.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षभरापूर्वी येथील किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली होती. या किल्ल्यास दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. किल्ल्यानजीक असलेल्या जेटीवर निवारा शेड नसल्याने पर्यटकांना उन्हाचा त्रास होतो. त्यामुळे जुन्या जेटीवर ज्याप्रमाणे निवारा शेड उभारण्यात आली आहे. तशीच निवारा शेड या जेटीवर उभारण्यात यावी अशी मागणी पर्यटक, शिवप्रेमींकडून करण्यात आली होती. त्यानुसार या जेटीवर निवारा शेड मंजूर झाली असून त्याची निविदा प्रक्रियाही झाली आहे. त्यामुळे किल्ल्यानजीकच्या जेटीवर निवारा शेड उभारण्याचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे असे आमदार नाईक यांनी सांगितले.
किल्ल्यावर देशातील एकमेव असे शिवराजेश्वर मंदिर आहे. या मंदिरात सिंहासन बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सध्या कोल्हापूर येथे हे सिंहासन बनविण्याची कार्यवाही सुरू असून तेही लवकरच मंदिरात बसविण्यात येणार असल्याचे श्री. नाईक यांनी स्पष्ट केले.
