रस्ते दुरावस्थे बाबत भाजप आंदोलन छडणार….

तालुकाध्यक्ष नासीर काझी यांचे तहसिलदारांना निवेदन

💫वैभववाडी दि.१९-: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे तालुक्यातील जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित विभाग या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याने गुरुवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी भाजपा आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा वैभववाडी भाजपच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार रामदास झळके यांना तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी दिले आहे.

तालुक्यात तरेळे – गगनबावडा, फोंडा – उंबर्डे, भुईबावडा – जांभवडे, खारेपाटण – गगनबावडा हे चार प्रमुख रस्ते आहेत. परंतु हे चारही रस्ते वाहतुकीस अत्यंत धोकादायक बनले आहेत. या रस्त्याने पायी चालणेही मुश्कील झाले आहे. या मार्गावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर वारंवार अपघातांची मालिका सुरू आहे. रस्त्याची डागडुजी करण्यात यावी यासाठी भाजपच्या वतीने लेखी पत्रव्यवहार यापूर्वी अनेकदा करण्यात आला आहे. परंतु याकडे संबंधित विभागाने जाणून बुजून दुर्लक्ष केले आहे. या विरोधात भाजपा नेते आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडणार आहे. दरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे निवेदनात म्हटले आहे.

You cannot copy content of this page