⚡सावंतवाडी ता.१४- : सन २०२२ हे बॅरिस्टर नाथ पै यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्याचे औचित्य साधून कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सिंधुदुर्ग व समर्थ साटम महाराज वाचन मंदिर, दाणोली यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळामध्ये “चला समजाऊन घेऊया, बॅरिस्टर नाथ पै यांचे जीवन चरित्रातील विविध पैलू” या विषयावर व्याख्याने महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक संघाचे कार्याध्यक्ष भरत गावडे देणार आहेत.
१५ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या कालावधीत शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन बॅरिस्टर नाथ पै यांचे जीवनचरित्र सांगितले जाईल. ज्या शाळांमध्ये व्याख्यान घेतले जाईल, त्या शाळांना बॅ. नाथ पै यांची प्रतिमा व एक पुस्तक भेट म्हणून दिली जाईल. सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला तसेच जवळपासच्या शाळांत यांचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण १० शाळा निवडण्यात आल्या आहेत. व्याख्यान झाल्यावर पाच प्रश्न व्याख्यानाच्या आधारे विचारले जातील, त्यांचे अचूक उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव दिनांक २४ सप्टेंबर रोजी बॅरिस्टर नाथ पै जन्मशताब्दी निमित्त अभिवादन सभा कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे. त्या कार्यक्रमाच्या वेळी गौरव केला जाईल. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, सचिव विठ्ठल कदम, अॅड. संतोष सावंत, प्रा. सुभाष गोवेकर, प्रा. रुपेश पाटील यांनी केले आहे.
