कणकवली नगरपंचायत विरोधी नगरसेवकांची सहाय्यक नगर रचना अधिकाऱ्यांकडे मागणी
⚡कणकवली ता.१३-: कणकवली शहराच्या सुधारित विकास आराखड्यात विविध बाबींचा विचार करून नागरिकांच्या घरांवरून, तसेच बिनशेती जमिनींवरून रस्ते व आरक्षणे वगळून नागरिकांवरील अन्याय दूर करण्यात यावा अशी मागणी कणकवली नगरपंचायतचे विरोधी नगरसेवक सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर व कन्हैया पारकर यांनी सहाय्यक नग रचना अधिकारी वी. तू. देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कणकवली शहराच्या सुधारित विकास आराखड्यासंदर्भातील बैठक गुरुवार ८ सप्टेंबर २०२२ रोजी कणकवली नगरपंचायत मध्ये आपण व आपल्या विभागाचे सर्व अधिकारी , नगरपंचायतचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी कणकवली शहराचा सुधारित विकास आराखडा तयार करण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र प्रथमतः २० वर्षापूर्वी कणकवली शहराला ग्रामपंचायतचे स्वरूप होते. त्यावेळी केलेला शहर विकास आराखडा नगरविकास विभागाच्या कार्यालयात बसून करण्यात आला होता. त्यामुळे सदर आराखड्यात सध्या अस्तित्वात असलेल्या नागरिकांच्या घरांवरून, तसेच बिनशेती जमिनींवरून रस्ते व आरक्षणे निश्चित करण्यात आलेली आहेत. त्यामुळे त्या नागरिकांवर अन्याय झाला आहे. असे म्हटले आहे.
श्री. देसाई यांनी यावेळी यासंदर्भात सर्व वस्तू स्थितीची माहिती घेतली जाईल असे आश्वासन दिल्याचे श्री नाईक यांनी सांगितले. तसेच यावेळी कणकवली शहरातील कुणावरही अन्याय होता नये अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली. गेली वीस वर्षे ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्या जमिनीवरील आरक्षणे उठवा अशी ही मागणी करण्यात आली. शहरातील बिनशेती जमिनीवर चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकले गेले. यामुळे गेली वीस वर्षे या नागरिकांवर अन्याय झाला आहे. तसा अन्याय यावेळी होता नये याची पूर्णपणे दक्षता घ्या अशी मागणी करण्यात आली. त्यावर श्री. देसाई यांनी यासंदर्भात प्रत्यक्ष जागेवर येऊनच सुधारित विकास आराखडा केला जाईल. कोणत्याही प्रकारे चुकीचा आराखडा करणार नाही अशी ग्वाही दिल्याची माहिती श्री नाईक यांनी दिली.
