⚡कणकवली ता.१२-:
उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून मारण्याची धमकी देणाऱ्या ग्रीन रिफायनरी विरोधक आप्पा जोशी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी शिंदे गटाच्या सहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांनी फिर्याद दिली असून दाखल फिर्यादीनुसार शिंदे गटाचे कार्यकर्ते शेखर राणे, बाळू पारकर, सुनील पारकर, भूषण परुळेकर, दामू सावंत, संदेश सावंत यांच्यावर भादवि कलम 143 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 अन्वये जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत श्री. खंडागळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे आज दुपारी 12.05 वाजण्याच्या सुमारास मराठा मंडळ रोडवर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयासमोर बेकायदेशीर जमाव केला व मनाई आदेश असताना देखील ग्रीन रिफायनरी विरोधक आप्पा जोशी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले व निषेध केला. खंडागळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.
