मालवणात अकरा दिवसांच्या गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप

⚡मालवण ता.१०-: गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… गणपती चालले गावला… चैन पडे ना आम्हाला…. असा जयघोष करत, बेंजोच्या तालावर तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत आज मालवणात अकरा दिवसांच्या गणेश मूर्तींचे भक्तीपूर्ण वातावरणात विसर्जन करत लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. अनंत चतुर्दशी दहाव्या दिवशी आल्याने काल मालवणात विसर्जन करण्यात येणाऱ्या गणेश मूर्तींची संख्या कमी दिसून आली असताना आज अकराव्या दिवशी मोठ्या संख्येने गणेश मूर्तींचे उत्साहपूर्ण व जल्लोषी वातावरणात विसर्जन करण्यात आले.

मालवणात सर्वत्र उत्साहात गणेशोत्सव साजरा होऊन गेले अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा अर्चा व सेवा केल्यानंतर आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. यानिमित्त मालवण समुद्र किनाऱ्यावर बंदर जेटी परिसरात आज सांयकाळी गणेश मूर्ती विसर्जनासाठी गणेश भक्तांची गर्दी दिसून आली. गणरायाचा जयघोष करत तर कुठे छोटेखानी सवाद्य मिरवणूक काढत तर कुठे बेंजोच्या तालावर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गणेश मूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. मालवण बंदर जेटी बरोबरच चिवला बीच, दांडी किनारा, देऊळवाडा नाका येथील व्हाळ, कोळंब खाडी आदी व इतर विसर्जन स्थळी गणेश भक्तानी गणेश मूर्त्यांचे विसर्जन करत लाडक्या गणरायाला निरोप दिला. यानिमित्त मालवण बंदर जेटी किनारा गणेशभक्तांनी फुलून गेला होता.

पावसाचे सावट असल्याने काही गणेश भक्तांनी लवकर विसर्जन करणे पसंत केले. बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यास सायंकाळी वरुणराजानेही हजेरी लावत बाप्पासह गणेशभक्तांवर जलवृष्टी केली. मात्र नंतर पावसाने विश्रांती घेतल्याने रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात काढण्यात आल्या. बेंजोच्या वादनाने अवघे मालवण दणाणून गेले होते तर गणेशभक्त गणरायाच्या भक्तीरसात चिंब भिजून गेले होते. मालवणात बंदर जेटी परिसरासह ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला होता. पोलीस कर्मचारी, वाहतूक पोलीस व होमगार्डस गणेश मिरवणुका व विसर्जनावर नजर ठेवून होते.

You cannot copy content of this page