शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा…
सावंतवाडी ता.१०-:
शिक्षण सेवकांना पंधरा ते बारा हजार मानधन देण्याबरोबरच केंद्रप्रमुखांची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी लवकरच शासन धोरण ठरवले जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. दरम्यान या ठिकाणी भरती होणार्या शिक्षकांनी तात्काळ बदलीसाठी आग्रह धरू नये. तर जो पर्यंत येथील मुलांची पर्यायी व्यवस्था होत नाही, तो पर्यंत धीर धरणे गरजेचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. केसरकर बोलत होते.
ते पुढे म्हणाले, या ठिकाणी गेली अनेक वर्षे शिक्षण सेवकांच्या मानधनाचा प्रश्न रेंगाळला आहे. सद्यस्थितीत त्यांना पाच ते सहा हजार रुपये असे तुटपुंजे मानधन मिळते. मात्र त्यांचा प्रश्न सुटावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून मानधनाचा आकडा बारा ते पंधरा हजारांपर्यंत जावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र काही तांत्रिक गोष्टी अडचणीच्या ठरत असल्यामुळे हा प्रश्न रेंगाळला आहे. परंतु येत्या काळात त्यासाठी आवश्यक असलेला केंद्राकडे पाठपुरावा निश्चितच करण्यात येईल, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, या ठिकाणी भरती झालेले अन्य जिल्ह्यातील शिक्षक भरती नंतर पुन्हा आपल्या जिल्ह्यात जाण्यासाठी प्रयत्न करतात. हा धागा पकडुन श्री. केसरकर यांनी शिक्षकांना आवाहन केले. बदली करून घेणे तुमचा हक्क आहे. परंतु ज्या जिल्ह्यात भरती झाली त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण ज्ञानदान देणे गरजेचे आहे. त्यासाठी तात्काळ बदलीचा आग्रह न धरता थोडा धीर धरावा, आम्ही निश्चितच तुमच्या मागण्या पुर्ण करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
