वेंगुर्ल्यात सोमवारी रंगनाथ पठारे यांच्याशी मुक्तसंवाद

⚡वेंगुर्ला ता.१०-: बॅ.नाथ पै ही राजापूर मतदार संघाची ओळख आहे. त्यांचा जन्म व शालेय शिक्षण वेंगुर्ल्यात झाले. गेल्या १०० वर्षात बॅ.नाथ पैंसारखा माणूस झाला नाही. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे विचार आजच्या तरुण पिढीसमोर यावेत व येथे एक वैचारिक चळवळ निर्माण व्हावी, यासाठी वेंगुर्ला नगरवाचनालय व बॅ.नाथ पै सेवांगण मालवण यच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. १२ रोजी सायंकाळी ४.३० वाजता वेंगुर्ला नगरवाचनालय येथे ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्याशी वर्तमान राजकीय, सामाजिक आणि साहित्य, संस्कृतीविषयी मुक्तसंवाद आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती अॅड. देवदत्त परुळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  रंगनाथ पठारे हे ज्येष्ठ कथालेखक, कादंबरीकार आणि समिक्षक आहेत. संगमनेर महाविद्यालयात ३७ वर्षे भौतिकशास्त्राचे अध्यापन त्यांनी केले. २००० साली प्रकाशित झालेली ‘आस्थेचे प्रश्न‘ ही त्यांची निबंधमाला गाजली. टोकदार सावलीचे वर्तमान, दुःखाचे श्वापद आदी कादंब-यामधून समकालीन समाजवास्तवाचा शोध त्यांनी घेतला. २०१९ साली सातपाटील कुलवृत्तांत ही ७९६ पानांची महाकादंबरी ‘शब्दालय‘ ने प्रकाशित केली. महाराष्ट्र शासनाचा २०२१ सालचा विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार तसेच ताम्रपट कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. अशा या ज्येष्ठ साहित्यिकाशी डॉ. महेश केळुसकर, संध्या नरे, सुमती लांडे या मुक्तसंवाद साधणार आहेत.

  सुमती लांडे या ‘पुस्तक वाचून मस्तक सुधारा‘ असे सांगत गेली ३५ वर्षे महाराष्ट्र फिरत शब्दालयाची ६०० प्रकाशन गावोगावी पोहोचविणा-या एकमेव प्रकाशक आहेत. संध्या नरे-पवार यांनी ‘तिची भाकरी कोणी चोरली‘ आणि ‘बहूजन स्त्रीचे वर्तमान‘ या आपल्या पुस्तकांनी महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेल्या लेखिका आणि पत्रकार आहेत. ‘डाकीण एक अमानवी प्रथा‘ या पुस्तकांतून त्यांनी आदिवासी स्त्रियांचे होणारे शोषण आणि दमन त्यांनी पहिल्यांदा जगासमोर आणले.

  महेश केळुसकर यांची कविता, कथा, कादंबरी, नाटक आदी वाङ्मय प्रकारातील ३५ पुस्तके आतापर्यंत प्रकाशित आहेत. पत्रकार परिषदेवेळी वेंगुर्ला नगरवाचनालयाचे कैवल्य पवार, महेश बोवलेकर, माजी सभापती जयप्रकाश चमणकर, किशोर सावंत आदी उपस्थित होते.
You cannot copy content of this page