अनंत चतुर्दशीनिमित्त मालवणात गणरायाला निरोप

⚡मालवण ता.०९-:
गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… गणपती चालले गावला… चैन पडे ना आम्हाला…. उंदीर मामा की जय… असा जयघोष करत, सनई- ताशांच्या आणि टाळ- मुदंगाच्या गजरात, बेंजोच्या तालावर तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत आज अनंतचतुर्दशी निमित्त आज गणेश मूर्तींचे भक्तीपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. मालवण बंदर जेटी समुद्र किनाऱ्यासह विविध विसर्जन स्थळी गणेशभक्तांनी गणेश मूर्त्यांचे विसर्जन करून लाडक्या गणरायाला निरोप दिला.

मालवणात सर्वत्र उत्साहात गणेशोत्सव साजरा होत असून यावर्षी दहाव्या दिवशी अनंत चतुर्दशी आल्याने गेले दहा दिवस गणरायाची मनोभावे पूजा अर्चा व सेवा केल्यानंतर आज अनंत चतुर्दशी निमित्त लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. यानिमित्त मालवण समुद्र किनाऱ्यावर बंदर जेटी परिसरात आज सांयकाळी गणेश मूर्ती विसर्जनासाठी गणेश भक्तांची गर्दी दिसून आली. गणरायाचा जयघोष करत तर कुठे छोटेखानी सवाद्य मिरवणूक काढत तर कुठे बेंजोच्या तालावर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गणेश मूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. मालवण बंदर जेटी बरोबरच चिवला बीच, दांडी किनारा, देऊळवाडा नाका येथील व्हाळ, कोळंब खाडी आदी व इतर विसर्जन स्थळी गणेश भक्तानी गणेश मूर्त्यांचे विसर्जन करत लाडक्या गणरायाला निरोप दिला.

हवामान खात्याने ११ सप्टेंबर पर्यंत वादळी वारे व पावसाचा इशारा दिल्याने पावसाचे सावट असल्याने आज गणेश भक्तांनी सायंकाळी लवकर गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यावर भर दिला. मालवणात सायंकाळपासून पावसाने रिमझिम सुरू केली होती. मात्र मोठा पाऊस नसल्याने गणेश विसर्जन सुरळीत पार पाडणे गणेश भक्तांना सुलभ झाले. अनंत चतुर्दशीदिनी होणाऱ्या गणेश मूर्त्यांच्या विसर्जनाच्या निमित्ताने मालवण पोलिसांनी बंदर जेटी परिसरासह ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला होता. पोलीस कर्मचारी, वाहतूक पोलीस व होमगार्डस गणेश मिरवणुका व विसर्जनावर नजर ठेवून होते.

You cannot copy content of this page