युवा रक्तदाता संघटनेच्यावतीने शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मागणी
सावंतवाडी : उप जिल्हा रूग्णालयात कायमस्वरूपी एम.डी. फिजिशिअन मिळावा अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील उप जिल्हा रुग्णालय सावंतवाडी इथं आरोग्य सेवेत असणारे डॉ. अभिजीत चितारी यांनी आपल्या कायमस्वरूपी सेवेतून राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात रूग्णांवर उपचार करण्यासाठी फिजीशी अन उपलब्ध नसल्यानं रूग्णांची हेळसांड होत आहे. नुसती हेळसांड नव्हे तर अनेकांना जीव गमवायची वेळ आली असून काहींनी गमावले आहेत. त्यात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेबाबत सर्वकाही ज्ञात आहे. गोवा बांबुळी शिवाय अन्य पर्याय गोरगरीब, सर्वसामान्य जनतेला उपलब्ध नाहीत. खासगी रूग्णालयात उपचार घेण शक्य नाही. त्यामुळे जीवाला मुकण हा एकमेव पर्याय जनतेसमोर शिल्लक राहिला आहे. यात ज्यांना आपण कुटुंबातील सदस्य समजता ते आपले सावंतवाडीतील भुमिपूत्र आहेत. केवळ डॉक्टर नाही, अन् उपचाराअभावी किड्यामुंग्यांसारखा त्यांचा जीव जात असल्यास यासारखं दुसरं दुर्देव नाही. आपल्या माध्यमातून दिलेल्या निधीतून रूग्णालतील भौतिक सुविधा व आधुनिकीकरण होत आहे. यंत्र सामुग्री देखील आपण उपलब्ध करून देत आहात. परंतु, अत्यावश्यक फिजीशी अन डॉक्टरच उपलब्ध नसतील तर या भौतिक सुविधांचा काय उपयोग?
त्यामुळे या विषयाची गंभीर दखल घेत तातडीनं कार्यवाही करण्यात यावी, कायमस्वरूपी एम.डी. फिजीशी उपलब्ध करून देण्यात यावा. ह्यात कोणाचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नसून गोरगरीब, सामान्य जनतेचा हा प्रश्न आहे. त्यामुळे आमच्या माध्यमातून मांडलेल्या सामान्यांच्या भावनांचा विचार करून आपण तातडीनं कार्यवाही करावी अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, शिक्षणमंत्री तथा मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.
