सिंधुदुर्गात ५५ हजार तर सावंतवाडीत १३ हजार शेतकऱ्यांची केवायसी बाकी

आजचा शेवटचा दिवस : 25 रोजी जमा होणार हप्ता : केवायसी करण्याचे सावंतवाडी तहसीलदारांचे आवाहन

⚡बांदा ता.०७-: पीएम किसानच्या लाभार्थ्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अद्यापही 55 हजार 164 शेतकऱ्यांनी तर सावंतवाडी तालुक्यातील 13 हजार 440 शेतकऱ्यांनी अद्यापही केवायसी केलेली नाही. जर दि.7 सप्टेंबरपर्यंत केवायसी न केल्यास 25 सप्टेंबर रोजी जमा होणारा किसान सन्मान योजनेचा हप्ता संबंधित शेतकऱ्यांना मिळणार नाही. त्यामुळे बाकी शेतकऱ्यांनी केवायसी करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले.
सद्यस्थितीत सोमवारपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 55 हजार 164 शेतकऱ्यांचे केवायसी करणे बाकी आहे. सावंतवाडी तालुक्यात 13 हजार 440 शेतकरी, देवगड मध्ये 6 हजार 610, दोडामार्ग मध्ये 4 हजार 402, कणकवली 7 हजार 573, कुडाळ 9 हजार 214, मालवण 6 हजार 419, वैभववाडी 3 हजार 958 आणि वेंगुर्ला 3 हजार 548 शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया प्रलंबित असून सदर व्यक्तींची यादी ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच यापुढे या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी दि.7 सप्टेंबर पूर्वी लाभार्थी शेतकऱ्यांनी केवायसी करणे बंधनकारक असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.
प्रशासन शेतकऱ्यांना सदैव सहकार्य करत असून ई केवायसी प्रक्रिया ग्रामपंचायत, आधार सेंटर, सीएसी किंवा मोबाइलद्वारे करू शकतो असे ते म्हणाले. जिल्ह्यातील एकूण 1 लाख 56 हजार 603 शेतकऱ्यांपैकी 1 लाख 1 हजार 439 शेतकऱ्यांनी इकेवायसी प्रक्रिया पूर्ण केली असून 55 हजार 164 शेतकरी अद्यापही बाकी आहेत. प्रलंबित सर्व शेतकऱ्यांनी आज 7 सप्टेंबर पर्यंत इकेवायसी करावी असे आवाहन तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले आहे.

You cannot copy content of this page