वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी तालुक्यासारख्या ग्रामीण व डोंगरी भागातील गोरगरीब विद्यार्थी आणि विद्यार्थिनीना उच्च शिक्षणाची सोय करणाऱ्या आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचा “ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय २०२०-२१” हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचालित आंनदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडी
येथील ग्रामीण भागातील तरुण आणि तरुणी हे सुसंस्कृत, सभ्य आणि सक्षम नागरिक होण्यासाठी उच्च शिक्षण देण्याचे महान कार्य संस्था, मा.अध्यक्ष श्री. विनोदजी तावडे यांच्या मार्गदर्शनाने करीत आहे. या महाविद्यालयाने गेली कित्येक वर्षे आपल्या शिक्षणाचा दर्जा कायम टिकवून अनेक स्पर्धेत आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला आहे.
या बाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत काकडे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, मुंबई विद्यापीठातील ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय कोणते ? याची चाचणी 2020-2021 या वर्षांत मुंबई विद्यापिठामार्फत घेण्यात आली होती. ही चाचणी शहरी व ग्रामीण वर्गातील महाविद्यालयांसाठी दर वर्षी घेतली जाते. यात महाविद्यालयातील सुखसोई उदाहरणार्थ इमारत, वर्गखोल्या, बैठक व्यवस्था, डिजिटल व्यवस्था सेमिनार हॉल, सांस्कृतिक हॉल, खेळाचे मैदान ,कार्यालयीन सुविधा, ग्रंथालय, प्रयोगशाळा इ. तसेच ऍकेडेमिक रेकॉर्ड, नॅकने दिलेले ‘ए ‘ मानांकन, विविध नवीन सुरू केलेले कोर्सेस, पेपर तपासणी मध्ये महाविद्यालयाचा सहभाग, संशोधनामधील सहभाग, संशोधन पेपर प्रसिद्धी, विद्यापीठाच्या विविध समितींवर महाविद्यालयातील प्राध्यापकांचा सहभाग , क्लस्टर कॉलेजमध्ये लीड महाविद्यालय म्हणून असलेला सहभाग, राष्ट्रीय सेवा योजना ,अविष्कार , क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये असलेला सहभाग इत्यादी सूक्ष्म बाबी तपासून पाहिल्या गेल्या. त्यात महाविद्यालयाने त्यातील सर्व शर्ती आणि अटी पूर्ण केल्या. या पुरस्कारासाठी ३०० हून अधिक महाविद्यालयांची प्रस्ताव सादर केला होता. त्यामधून ठाणे (ग्रामीण), पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाला प्राप्त झाला, अशी माहिती डॉ. काकडे यांनी दिली.
सोमवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी ,फिरोजशहा मेहता ऑडिटोरियम हॉल,मुंबई विदयापीठ,सांताक्रूझ (पूर्व )येथे सकाळी ११ वाजता एका शानदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, रु. ५०,०००/- धनादेश असे या पुरस्काराचे स्वरुप होते. हा पुरस्कार मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र. कुलगुरू प्रा.रविंद्र कुलकर्णी, प्रभारी कुलसचिव प्रा. शैलेंद्र देवळणकर यांच्या शुभहस्ते संस्था पदाधिकारी, प्राचार्य यांच्याकडे पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे महाविद्यालयाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाला ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय २०२०-२१ पुरस्कार
