न्हावेली महिला सरपंचांनी पाच वर्षात आणला 72 लाखांचा निधी

विविध माध्यमातून ग्रामपंचायतला मिळाले सात लाखांचे पुरस्कार

⚡सावंतवाडी ता.०६-: विकासाच्या प्रक्रियेत गाव शहराच्या बरोबरीने विकसित व्हावे या उद्देशातून ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहाराचे संपूर्ण अधिकार सरपंचांना दिले आहेत. ग्रामपंचायतीचा गोळा होणारा स्वनिधी कितीही असो, पण सरपंचाने ठरविले तर गावाच्या विकासासाठी तो कुठुनही निधी खेचून आणू शकतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे न्हावेली सरपंच प्रतिभा प्रकाश गावडे यांनी गावात केलेली 71 लाख 69 हजार 863 रुपयांची कामे व पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला मिळालेले 7 लाख 15 हजार रुपये होय.

थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंच प्रतिभा गावडे म्हणाल्या की, पाच वर्षांचा कालावधी जवळपास संपत येत आहे. गावाच्या विकासात ग्रामसेवक तृप्ती राणे, उपसरपंच विठोबा गावडे, ग्रा.पं.सदस्य शरद धाऊसकर, भावना धाऊसकर, जयश्री नाईक, प्रेमलता मसुरकर, उदय पार्सेकर, सौ.दाभोलकर, सावित्री परब, संकिता नेमण आणि कर्मचारी विनायक आरोंदेकर, विनायक कालवणकर, संतोष निर्गुण, उत्कर्षा हरमलकर तसेच मतदार ग्रामस्थांच्या सहकार्याने गावात पाच वर्षात एकूण 47 विकासकामे केली. यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून 71 लाख 69 हजार 863 रुपयांचा निधी आणला. तर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, स्मार्ट ग्राम पुरस्कार, गणेश सजावट अशा अनेक पुरस्कारांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या तिजोरीत 7 लाख 15 हजारांची भर टाकली. तसेच 23 लाख 11 हजार 726 रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. एकंदरीत याकामी ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.
न्हावेली-रेवटेवाडी नळयोजना टाकी व विहिरीसाठी जागा, चौकेकरवाडी सार्वजनिक पाण्याची विहिर, टेंबवाडी व पार्सेकरवाडी येथील इसवटी गणेश घाट बांधणे, धाऊसकरवाडी विंधन विहिर, चौकेकरवाडी व्यायाम शाळा व सार्वजनिक वाचनालय, ग्रामपंचायत कार्यालय न्हावेली, धाऊसकरवाडी लघुनळयोजनासाठी ग्रामस्थांनी विनामोबदला जागा दिल्याचे सांगत त्यांनी आभार मानले.
जनतेने मला पाच वर्ष सेवा करण्याची संधी दिली त्याचे सोने केले. सर्वात महत्वाचे म्हणजे ग्रामस्थांनी केलेले सहकार्य आहे. मतदारांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली असून यापुढेही आपण गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिभा गावडे यांनी नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत सांगत सर्वांचे आभार मानले.

You cannot copy content of this page