⚡कणकवली ता.२९-: वनसंरक्षीत प्राणी बिबट्याची हत्या करून त्याचे कातडे, नखे याची तस्करी केल्याप्रकरणी तळेबाजार येथील श्रावण लक्ष्मण माणगांवकर, कुंभवडे येथील श्रीराम सखाराम सावंत व भिरवंडे येथील मंगेश पांडुरंग सावंत यांची प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. व्ही. हांडे यांनी प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या सशर्थ जामिनावर मुक्तता केली. आरोपींच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
दि. ४ ऑगस्ट २०२२ रोजी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला मिळालेला माहितीवरून तळेरे येथे श्रावण माणगांवकर चालवत असलेल्या बलेनो कारची तपासणी केली असता त्यात ३ लाख ५० हजार रुपये किंमतीचे बिबट्याचे कातडे सापडले होते. यावेळी आरोपी राजेंद्र पंढरीनाथ पारकर यालाही अटक करण्यात आली होती. तपासात भिरवंडे येथील आप्पा सावंत व मंगेश सावंत यांनी सदर बिबट्याची कुंभवडे येथे हत्या करून त्याचे कातडे, नखे, हाडे जतन करून त्याबाबत कुंभवडे येथील संतोष मेस्त्री व श्रीराम सावंत या मध्यस्थांमार्फत श्रावण माणगांवकर याच्याकडून एक लाख घेतले. तसेच राजेंद्र पारकर याच्या मध्यस्थिने फणसगांव येथील समीर नारकर याला विकण्यासाठी नेले जात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तपासात बंदुक, कोयते तसेच शिकारीचे अन्य साहित्य जप्त केले होते.
तपासात सदरचे कातडे १५ लाख रुपयाला विक्री करत असल्याबाबत निष्पन्नही झाले होते. आरोपी ११ ऑगस्टपासून न्यायालयीन कोठीत होते. यापैकी श्रावण माणगांवकर, श्रीराम सावंत व मंगेश सावंत यांच्यावतीने जामिनासाठी अर्ज दाखल केला असता प्रत्येक २५ हजार रुपयांच्या जाचमुचलक्यावर तसेच तपासात सहकार्य करावे, पोलीस स्टेशनला हजेरी लावावी व साक्षीदारांवर दबाव आणू नये या अटींवर जामिन मंजूर केला.
