पोलीस निरीक्षक विजय यादव
⚡मालवण ता.२९-: गणेशोत्सव कालावधीत प्रत्येक व्यापारी, रिक्षाचालक, वाहनचालकांनी एकमेकांना सहकार्य करावे. जेणेकरून वाहतुकीला अडथळा येणार नाही. आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही, याची खबरदारी प्रत्येकाने घेतल्यास गणेशोत्सव कोणतेही गालबोट न लागता साजरा होईल, असे आवाहन मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी येथे बोलताना केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कट्टा येथे व्यापारी, रिक्षा व्यावसायिक, ग्रामस्थांची बैठक संपन्न झाली. त्यावेळी पोलीस निरीक्षक विजय यादव, कट्टा पोलीस दूरक्षेत्राचे चव्हाण, पोलीस नाईक कैलास ढोले, कट्टा व्यापारी संघ अध्यक्ष प्रवीण गाड, जिल्हा व्यापारी संघाचे पदाधिकारी अरविंद नेवाळकर, प्रितम खटावकर, सतीश वाईरकर, पोलीस पाटील संतोष जामसंडेकर, वंदेश ढोलम, संतोष गिरकर, दादा रावले, राजू चव्हाण आदी उपस्थित होते.
व्यापारी बांधवांनी आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांनी चारचाकी गाडी आणल्यास, ती गाडी कोणाला अडथळा निर्माण होणार नाही, अशा ठिकाणी पार्किंग करावी. व्यापाऱ्यांचा माल घेऊन येणारी मोठी मोठी वाहने दुपारी कमी रहदारीच्या वेळेत आणावी, अशा सूचना करण्यात आल्या. रिक्षा व्यावसायिकांनीही आपल्या रिक्षा लावताना वाहतुकीला अडथळा येणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या. लाऊडस्पीकरचा वयोवृद्ध माणसांना त्रास होणार नाही. तसेच फटाक्यांच्या धुरामुळे कुणाला त्रास होणार नाही, याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले. या नियमांचे उल्लंघन केल्यास आणि कुणाची तक्रार असल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या सर्व नियमांचे पालन करून आपला व्यापार-धंदा केल्यास गालबोट न लागता सण साजरा होईल, याची खबरदारी घ्या, असे निरीक्षक यादव यांनी सांगितले.
