अन्यथा महावितरणला आमच्या स्टाईलने जाब विचारावा लागेल

महावितरणच्या विरोधात नगराध्यक्ष समीर नलावडे आक्रमक

⚡कणकवली ता.२९-:
गणेश चतुर्थीला अवघे दोन दिवस राहिले, असताना देखील सोमवारी मेंटेनन्सच्या नावाखाली वीज पुरवठा खंडित करणाऱ्या महावितरणच्या विरोधात कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. गेल्या दोन वर्षांच्या कोविड कालावधीनंतर यावर्षी निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा होत असताना गेली दोन वर्ष महावितरणचे अधिकारी मेंटेनन्स करण्याकरता कुठे गेले होते? असा खडा सवाल समीर नलावडे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना उपस्थित केला.

गणेश चतुर्थीला अवघे दोन दिवस शिल्लक राहिलेले असताना सोमवारी सकाळी कणकवली शहरा सह अन्य भागातील ही विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. दरम्यान समिर नलावडे यांनी याबाबत जाब विचारला. श्री. नलावडे यांनी यावेळी गणेश चतुर्थी करिता बाजारपेठ सज्ज झाल्या असून, व्यापारी ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. असे असताना आणि चतुर्थीच्या तोंडावर विद्युत पुरवठा खंडित करणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. व्यापारी कोविडमुळे हवालदिल झालेले असताना या कोविडच्या महामारीनंतर व्यापारी यावर्षी तरी व्यवसाय व्यापार चांगला होईल या आशेने आहेत. असे असताना मेंटेनन्सच्या नावाखाली विद्युत पुरवठा खंडित केला तर त्याचा बाजारपेठांवर मोठा परिणाम होणार आहे. विद्युत उपकरणे या निमित्ताने मोठ्या प्रमाणात विक्री होत असताना त्या व्यवसायिकांना देखील याचा फटका बसणार आहे. मेंटेनेस करायचा होता तो गेल्या दोन वर्षात का केला नाही? असा खडा सवाल देखील श्री. नलावडे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केला. गणेश चतुर्थी काळात विद्युत पुरवठा खंडित करू नका. तसेच झाल्यास जनतेचा उद्रेक होईल असा इशारा देखील श्री नलावडे यांनी दिला. गणेश चतुर्थी हा कोकणात सर्वात मोठा सण असून, या काळात महावितरण जर सोमवारचा मेंटेनन्स नावाखाली विद्युत पुरवठा खंडित करत असेल तर महावितरणला याकरिता आमच्या स्टाईलने जाब विचारावा लागेल असा इशारा देखील समीर नलावडे यांनी दिला.

You cannot copy content of this page