⚡मालवण ता.२८-: मालवण मधील सामाजिक कार्य करणाऱ्या १०० ईडीएट्स या व्हाट्सअप ग्रुपने शहरातील शीत शवपेटीची गरज लक्षात घेऊन ग्रुपच्या वतीने शीत शवपेटी उपलब्ध केली आहे. या शवपेटीचे लोकार्पण रविवारी तहसीलदार अजय पाटणे यांच्या उपस्थितीत फोवकांडा पिंपळपार येथे करण्यात आले.
मालवण ग्रामीण रुग्णालयात शीत शवपेटी उपलब्ध आहे. मात्र या शवपेटीत शव असल्यास त्याचवेळी दुसऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास शीत शवपेटीची गरज भासते. त्यामुळे १०० ईडीएट्स ग्रुपने सामाजिक दायित्व म्हणून ही शीतशव पेटी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी ग्रुपच्या सदस्यांनी आर्थिक हातभार लावला. याचा लोकार्पण सोहळा शहरातील फोवकांडा पिंपळ येथे रविवारी करण्यात आला. यावेळी तहसीलदार अजय पाटणे यांच्यासह ग्रुपचे अडमीन सीझर डिसोझा, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्यासह ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. गरजू व्यक्तींना अत्यल्प मोबदल्यात ही शीत शवपेटी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे ग्रुप ऍडमीन सीझर डिसोझा यांनी स्पष्ट केले.
