⚡कणकवली ता.२६-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत कणकवली पंचायत समितीतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ‘स्वराज्य महोत्सव’ या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या तनिष्का संदीप सावंत हिने इयत्ता ८ वी ते १०वी या गटामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या हस्ते सन्मानपूर्वक ‘सन्मान चिन्ह’ व प्रमाणपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्यावेळी तहसीलदार आर जे पवार, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण व गटशिक्षणाधिकारी किशोर गवस आदी मान्यवर उपस्थित होते.
बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या तनिष्का सावंत हिने या स्पर्धेसाठी ‘माझ्या स्वप्नातील भारत देश’ या विषयावर उत्कृष्ट असे वक्तृत्व सादर केले होते. तालुक्यातील विविध शाळातील स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. परीक्षकांच्या अंतिम निर्णयानुसार तनिष्का सावंत हिची या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी निवड करण्यात आली. तिच्या या सत्कार सोहळ्यानिमित्त संस्थेच्या सेक्रेटरी सुलेखा राणे यांनी तिचे अभिनंदन केले .
