शहरातील विविध प्रश्नांकडे माजी नगराध्यक्ष व भाजप पदाधिकारी यांनी वेधले मुख्याधिकारी यांचे लक्ष …

गणेश चतुर्थीपूर्वी समस्या दूर करण्याची केली निवेदनाद्वारे मागणी…

मालवण दि प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरातील विविध कामांच्या प्रश्नावर आज मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची भेट घेत निवेदन सादर केले. मालवण शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली झाडी, गणेश विसर्जन स्थळांची स्वच्छता, डास प्रतिबंधक फवारणी व इतर कामे आचरेकर यांनी जिरगे यांच्या निदर्शनास आणून देत सदर कामे गणेश चतुर्थीपूर्वी पूर्ण करण्याची मागणी केली. यावर जिरगे यांनी सदर कामे तातडीने पूर्णत्वास नेली जातील अशी ग्वाही दिली.

यावेळी सुदेश आचरेकर यांच्यासह माजी नगरसेवक दीपक पाटकर, आपा लुडबे, मोहन वराडकर, भाजप किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, भाजयुमो शहराध्यक्ष ललित चव्हाण, उत्तम पेडणेकर, विद्या मेस्त्री, आबा हडकर, राजू बिडये, आपा मोरजकर, नंदू देसाई, श्री. आचरेकर आदी व इतर उपस्थित होते.

गणेशोत्सवाला आठवडाभर कालावधी शिल्लक राहिला तरीही मालवण शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली झाडी झुडुपे अद्यापही तोडण्यात आलेली नाही. शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून डास प्रतिबंधक फवारणी देखील सुरू झालेली नाही. तसेच गणेश विसर्जन स्थळांची स्वच्छता व डागडुजीची कामेही करण्यात आलेली नाही. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेकडून दरवर्षी ही कामे करण्यात येतात. मात्र यावर्षी ही कामे अद्यापही करण्यात आलेली नाही. त्यामुळे सदर कामे लवकरात लवकर करण्यात यावीत अशी मागणी सुदेश आचरेकर यांनी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे केली.

तसेच मालवण बाजारपेठेत सुरू असलेल्या भाजी मंडई इमारतीच्या कामाच्या ठिकाणी पारकर बियर शॉपीच्या बाजूने घातलेले पत्र्याचे कंपाउंड हे रस्त्याच्या खूपच जवळ असल्याने त्याठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. तसेच बांधकामासाठी आणलेली वाळू देखील रस्त्यालगत टाकण्यात आली आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असून गणेशोत्सव काळात याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते. त्यामुळे सदर पत्र्याचे कंपाउंड हे रस्ता सोडून आत घालण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला द्याव्यात अशी मागणीही आचरेकर यांनी केली. गणेशोत्सव पूर्वी करावयाच्या कामांबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तातडीने कामे केली जातील असे आश्वासन यावेळी मुख्याधिकारी श्री. जिरगे यांनी दिले.

You cannot copy content of this page