तृतीयपंथी हा समाजाचा घटक असून त्यांना माणूस म्हणून समाजाने वागवावे

पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका रिया आळवेकर यांनी उलगडला जीवनपट

⚡कणकवली ता.२३-:
तृतीयपंथीयांचे जीवन खूप संघर्षमय असते. हे संघर्षमय जीवन जगताना त्यांना आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ठोकर खावी लागते. तृतीयपंथी व्यक्तीला स्वत:चे अस्तित्व सिद्ध करताना स्ट्रगल करावे लागते. प्रवीण ते रिया बनण्याचा माझा प्रवास हा खूप खडतर होता. या प्रवासात माझी जी घुसमट झाली, त्यातून मला आज स्वातंत्र्य मिळाल्यासारखे वाटत आहे. या खडतर प्रवासात ज्यांनी ज्यांनी मला साथ दिली, त्यामुळे मी उभारी घेऊन देशातील पहिली तृतीयपंथी शासकीय शिक्षिका बनू शकली. तृतीयपंथी हा समाजाचा घटक असून त्यांना माणूस म्हणून समाजाने वागवावे, अशी अपेक्षा देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका रिया आवळेकर यांनी व्यक्त केली.यापूढे मी स्पर्धा परीक्षांना सामोरी जावून नक्की राजपत्रित अधिकारी बनेन व जिल्ह्याची सेवा करेन, असा आत्मविश्वास आळवेकर यांनी व्यक्त केला.

गोपुरी आश्रमाच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमांतर्गत मिळून साऱ्याजणी मासिक पुणे यांच्या 33व्या वर्धापनदिनानिमित्त येथील गोपुरी आश्रमच्या बहुउद्देशीय सभागृहात तृतीयपंथी शासकीय शिक्षिका रिया आळवेकर यांची प्रकट मुलाखत कवयित्री सरिता पवार यांनी घेतली. यावेळी गोपुरी आश्रमचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर, रवींद्र मुसळे, मंगेश नेवगी, अर्पिता मुंबरकर, डॉ. शमिता बिरमोळे, डॉ. रश्मी पेहूरकर, रेश्मा भाईप आदी उपस्थित होते.

रिया आळवेकर म्हणाल्या, तृतीयपंथींकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. त्यांची समाजात घुसमट होत असते. मात्र, तृतीयपंथी व्यक्ती समाजाचा एक घटक असून त्यांना समाजाने माणुसकीची वागणूक दिली पाहिजे. प्रवीण ते रिया आळवेकर बनण्याचा माझा प्रवास हा खूप संघर्षमय आणि कठीण होता. या प्रवासात माझी समाजाकडून चेष्टा, टेहाळणी केली गेली. त्यामुळे खूप मनाने खचली होती. काही वेळा स्वत:ला संपवून घ्यायचे ठरवले होते. पण नियतीने माझ्याबाबतीत हे करू दिले नाही. आरसा हा माझा खरा मित्र होता. जेव्हा जेव्हा मला कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागत होते, त्या दिवशी आरशात स्वतःला बघून रडायचे आणि माझ्या मनाची घुसमट होत होती. नैसर्गिक भावनांची होत असलेली घुसमट फोडत शासकीय नोकरीत असताना 2019 साली लिंगबदल शस्त्रक्रिया करून घेत मी वेगळी ओळख समाजात निर्माण केली आहे. मात्र, आजही समाजात अशा अनेक रिया आहेत ज्या आपली मानसिक कोंडी फोडू शकल्या नाहीत. माझा हा प्रवास अशा अनेक अज्ञात तृतीयपंथीयांना सन्मानाने समाजात जगण्यासाठी बळ देणारा आहे. माझ्या आजवरच्या जीवनप्रवासात जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्याधिकारी प्रजीत नायर, सर्व प्रशासन यांचे अनमोल मार्गदर्शन आणि साथ लाभली.

आळवेकर म्हणाल्या, शाळेत असल्यापासून नोकरीला लागेपर्यंत मी शरीराने पुरुष असलो तरी मनाने स्त्री होते. समाजाच्या भीतीपायी माझ्या मनाची व शरीराची घुसमट होत होती. या घुसमटीतून २०१४ साली मी माझे घर सोडले. त्यानंतर कोल्हापूर येथील माझ्या गुरु मयुरी आळवेकर यांच्याकडे गेले. त्यांनी चांगले मार्गदर्शन करून जगण्याची नवी उमेद दिली. या उमेदीतून मी स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकले. मला देशातील पहिल्या शासकीय तृतीयपंथी शिक्षक बनण्यात सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी व सीईओंसह प्रशासनाने चांगल्याप्रकारे सहकार्य केले. त्यामुळे मला शिक्षक होण्याचा मान मिळाला. या मानामुळे माझे आयुष्य खया अर्थाने स्वतंत्र्य झाले. तृतीयपंथी व्यक्तींना समाजासमोर स्वतःची ओळख बनवण्यासाठी खूप संघर्ष व आव्हानांचा सामना करावा लागतो. तृतीयपंथीचा जीवनप्रवास खूप संघर्षमय असून हा प्रवास जगताना सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागते. समाजाचा तृतीयपंथी व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची नितांत गरजेचे आहे.

सरिता पवार यांनी विविध प्रश्न विचारून साधलेल्या संवादामध्ये रिया यांनी खडतर जीवनातून यशस्वी प्रवास कशाप्रकारे याचा उलगडा केला. मनोधैर्य खचू न देता जीवनात येणाऱ्या कठीण प्रसंगांना मी सामोरे कशाप्रकारे गेले ही कहाणी रिया यांनी उपस्थितांसमोर मांडली. या प्रवासात तिला भेडसावलेले प्रश्न, निर्माण झालेल्या अडीअडचणींनी व समस्या देखील उपस्थितांसमोर कथन केल्या.
यावेळी मिळून साऱ्याजणी, गोपुरी आश्रम तसेच रोटरीतर्फे रिया आळवेकर यांचा सत्कार करण्यात आला. मुलाखती दरम्यान भूतकाळाबाबत व वर्तमानकाळाबाबत सांगितले. मात्र भविष्याबाबतही मी सांगू इच्छिते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मला खूप प्रेम मिळाले. जनतेने स्वीकारले. यावेळी मिळून साऱ्याजणी मासिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला नगरसेविका मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, रोटरीच्या अध्यक्षा वर्षा बांदेकर, नीलम सावंत पालव, अशोक करंबेळकर, कल्पना मलये, बाळू मेस्त्री आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page