⚡मालवण ता.२२-: वीज युनिट दर कमी करा… नायतर खुर्च्या खाली करा… या सरकारच करायचं काय ? खाली डोकं वर पाय… थंड एसी मध्ये बसून सामान्य जनतेला घाम फोडणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध असो… अशा घोषणा देत आज मालवणात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भरमसाठ वीज बिलांच्या विरोधात मालवणच्या वीज वितरण कार्यालयासमोर वीज बिले जाळून निषेध आंदोलन केले . महाराष्ट्र वीज वितरण कंपनी वीज ग्राहकांना वाढीव वीज बिले देऊन लूट करत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी करत आगामी काळात वीज समस्या न सुटल्यास आणि वीज वितरणाची मनमानी सुरूच राहिल्यास गणेशोत्सवनंतर पितृपंधरवड्यात वीज अधिकारी व या विभागाचे मंत्री व यांच्या नावाने मालवण कार्यालयाच्या आवारात श्राद्ध घालण्यात येईल. असा इशारा मोंडकर यांनी दिला आहे
भरमसाठ वीज बिले व वीज समस्यांबाबत वीज अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याबाबत आज मालवण राष्ट्रीय काँग्रेसतर्फे वीज कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी वीज बिले जाळून व घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, अरविंद मोंडकर, बाळु अंधारी, श्रीकृष्ण तळवडेकर, देवानंद लुडबे, महिला तालुकाध्यक्ष ममता तळगावकर, जेम्स फर्नांडिस,
सरदार ताजर, अमृत राऊळ, पल्लवी तारी- खानोलकर, गणेश पाडगावकर, श्रेयस माणगांवकर, लक्ष्मीकांत परुळेकर, बाबा मेंडिस, योगेश्वर कुर्ले, केदार केळुसकर, मयूर तळगावकर, श्रीहरी खवणेकर, ऐश्वर्या काळसेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी अरविंद मोंडकर म्हणाले, कोरोना काळानंतर अनेकांना व्यवसाय सुरळीत करण्यासाठी धडपडाव लागले . अनेक नागरिकांचे छोटे मोठे व्यवसाय बंद झाले होते. इथल्या पर्यटनावर परिणाम झाला होता. तरी सुद्धा वर्षभरात नागरिकांनी व्यापाऱ्यांनी त्या दरम्यान आलेली लाईट बिल भरली. मात्र आता तर मागील थकबाकी नावाखाली अजूनही हजारोंच्या पटीत लाईट बिल काढली जात आहेत. एव्हरेज बिल नावाखाली ही लूट सुरू आहे.
ज्या घरात एक ट्यूब, फॅन, मिक्सर अशी सर्वसामान्य उपकरणे आहेत. त्यांना पूर्वी १५० ते २०० रुपये बिल येत होती. मात्र आता हीच बिले हजारामध्ये येऊ लागली आहेत. विजेची बिले थकीत राहिली असली तरीही त्यानंतर येणारी बिले ही अवाच्या -सवा काही हजारात वाढून येत आहेत. वीज युनिटचे दर वाढले असून वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्या व कनेक्शन मध्येही तांत्रिक दोष निर्माण होत असल्याने वीज मीटरवर जास्त युनिट पडत आहे परिणामी वीज बिले जास्त येत आहेत. वीज वाहिन्या व ट्रान्सफॉर्मर यांच्या बाबत योग्य दखल न घेतल्याने वीज कर्मचाऱ्यांच्या चुकांमुळे वीज मीटर मध्ये येणारी वीज ही वारंवार कमी जास्त प्रमाणात येत असून त्याच्या लोड मुळे अनेक घरांमधील विद्युत उपकरण देखील खराब झाली असून नागरिकांना वर्षाला लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. मीटर रिडींग घेणाऱ्या कंपन्यांच्या चुकांमुळे देखील ही बिले वाढलेली येत आहेत. प्रामाणिकपणे सामान्य जनता बिल भरत असतानाही विद्युत वितरणाच्या गलथान कारभारा मुळे लोकांना बिल भरताना घाम फुटत आहे. याबाबत वेळोवेळी वीज अधिकाऱ्यांचे लक्ष वेधुनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. अधिकारी कोणत्याही प्रकारे नागरिकांना सहकार्य न करता घरोघरी जाऊन वीज मीटर कट करत आहेत, असे अरविंद मोंडकर म्हणाले.
वीज अधिकारी जाग्यावर नसतात, तक्रारीचा फोन उचलला जात नाही. तक्रारींकडे लक्ष न देता अधिकारी जाणून बुजून वितरण कंपनीला मोठ्या प्रमाणात मोबदला मिळवून देण्यात मग्न असल्याने आज काँग्रेसतर्फे वाढीव वीज बिले जाळून शासनाचा निषेध करण्यात आला, असे मोंडकर म्हणाले. शासनाने वीज दर कमी करावा तसेच भरमसाठ बिलातून ग्राहकांना सूट द्यावी, अशी मागणी यावेळी मोंडकर यांनी केली.
गणेशोत्सवात जवळ आला असून
यावेळी कोणत्याही नागरिकाचे विज कनेक्शन तोडण्यात आले तर गणेशोत्सव नंतर या ठिकाणी नागरिकांच्या तक्रारी घेण्यासाठी काँग्रेस कडून दोन दिवशीय शिबिर आयोजित करणार येणार आहे
या शिबिरामध्ये वितरण कंपनीने नागरिकांना त्रास दिल्यास त्याबाबत येणाऱ्या तक्रारी नुसार अधिकारी व कंपनी विरोधात ग्राहक तक्रार मंचाकडे देखील तक्रार करणार असल्याचा इशारा मोंडकर यांनी दिला.
