महिनाभर सुरू होते उपचार
*💫सावंतवाडी दि.२७-:* आरोस गिरोबावाडी येथून आरोस बाजारच्या दिशेने जाणारे वायरमन दीपक आत्माराम नाईक(45) यांच्या दुचाकीसमोर अचानक बिबटा आल्याने मोठा अपघात झाला होता. अपघात भीषण असल्याने गेले 25 दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना आज बुधवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. आरोस मधील दीपक नाईक यांना झालेल्या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर गोवा बांबोळी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारात ते चांगला प्रतिसाद देत असल्याने त्यांना सावंतवाडी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु आज दुपारी उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली अन आरोस गावावर शोककळा पसरली. दांडेली-आरोसमार्गे कोंडुरा रस्त्यावर गवे रेडे व बिबट्याचा वावर कायम असतो. त्या रात्री 11 वाजताच्या सुमारास वायरमन दीपक नाईक आपल्या घरी गिरोबावाडी येथून आरोस बाजार येथे जात असताना अपघात झाला अन आज श्री. नाईक यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. रात्रंदिवस ग्राहकांना सुरळीत सेवा देण्यासाठी त्यांची सदोदित तळमळ होती. आरोस गावासह मडुरा, पाडलोस, रोणापाल, न्हावेली गावातील वीज ग्राहकांना रात्रंदिवस उत्तम सेवा देण्यासाठी त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या जाण्याने आरोस पंचक्रोशीतील नागरिकांवर शोककळा पसरली आहे. दीपक नाईक यांच्या पतश्यात पत्नी, तीन मुली, भाऊ, भावाज असा मोठा परिवार आहे.
