खरीप पिके उत्पादन वाढ माहिमेस प्रारंभ

कृषी विभागाच्या वतीने मौलिक मार्गदर्शन

⚡सावंतवाडी ता.२२-: महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या कृषी विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक विकास पाटील यांच्या संकल्पनेतून शेती व शेतकरी यांना नवचैतन्य देण्यासाठी विविध मोहिमा राबविल्या जात आहेत. यावर्षी खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर बीजप्रक्रिया मोहिम कृषी संजीवनी मोहिमेच्या यशस्वी आयोजनानंतर दिनांक १७ ते ३० ऑगष्ट दरम्यान खरीप पिके उत्पादन वाढ मोहिम सुरू केली आहे.
सदर मोहीमेचा भाग म्हणून सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे गावातील मळईवाडी येथे कार्यक्रम घेण्यात आला. भात, नाचणी या खरीप पिकांबरोबरच नारळ, सुपारी व काजू या फळपिकांच्या उत्पादन वाढीसाठी वापरावयाच्या तंत्रज्ञानाबददल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात कृषी पर्यवेक्षक यशवंत गव्हाणे यांनी भात व नाचणी या पिकांत नत्र स्फुरद व पालाश या अन्नद्रव्याबरोबच लोह, मँगेनीज, बोरॉन, जस्त, कॉपर मॉलीब्डेनम इ. अन्नद्रव्याचा वापर पिकांवरील किड रोग नियंत्रणासाठी, जैविक व सेंद्रीय किटकनाशकांचा वापर जमीन व पाणी यांचे प्रदूषण रोखणे व नत्राचा अपव्यय टाळणे, नत्राचा कार्यक्षम वापरासाठी नॅनो युरियाचा फवारणीमधून वापर करणे, किडीपासून पिकांचे नैसर्गिक पद्धतीने संरक्षण करण्यासाठी पक्षी थांबे उभारणे इत्यादीबाबत मौलिक मार्गदर्शन केले.
यावेळी शिरशिंगेचे उपसरपंच पांडुरंग राऊळ म्हणाले की, सैन्यातील जवान ज्याप्रमाणे देशाचे रक्षण करतात, त्याप्रमाणे आपली शेतजमीन व मातीचे संरक्षण करण्याची मोठी जबाबदारी शेतकऱ्यांवर आहे. ती नापीक होवू नये, याची काळजी घ्यावी. गव्हाणे साहेबांनी दिलेल्या उत्पादनवाढीच्या छोटया-छोट्या गोष्टी अंमलात आणण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच तालुक्यापासून दूर असलेल्या व डोंगर – द-यांमध्ये वसलेल्या वाडया-वस्त्यांपर्यत कृषी विभाग पोहोचत असल्याबाबत विभागाचे कौतुकही त्यांनी केले.
बीजप्रक्रिया मोहिमेमध्ये जीवाणू खताचा वापर केलेले शेतकरी व शिरशिंगे ग्रामपंचायत सदस्य संदीप राऊळ यांनी जीवाणू खते नॅनो युरिया व कृषी विभागाचे मार्गदर्शन मोलाचे ठरत असल्याचे सांगून कृषी विभागास धन्यवाद दिले. या कार्यक्रमामध्ये पक्षी थांबे उभारणे, नॅनो युरियाची फवारणी व सुक्ष्म अन्नद्रव्याचा वापर ही प्रात्यक्षिके शेतावर दाखविण्यात आली. ग्रामस्थांच्या सहकार्याने
या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार शिरशिंगे गावचे कृषी सहाय्यक अक्षय खराडे यांनी केले. या कार्यक्रमास शिरशिंगे गावचे उपसरपंच पांडूरंग राऊळ, ग्रामपंचायत सदस्य संदीप राऊळ यांच्यासह जगन्नाथ राऊळ, विश्राम निकम , गितांजली राऊळ, रघुनाथ आमोणेकर, गंगाराम राऊळ, ज्योती राऊळ, रामचंद्र राऊळ, वसंत राऊळ, मधुकर राऊळ, महादेव दळवी यांसह शिरशिंगे गावातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page