Headlines

अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबतची प्रकिया स्थगित

काट्राईब शिक्षक संघटनेची आक्रमक भूमिका;आकाश तांबे
व संदीप कदम यांनी दिली माहिती

⚡कणकवली ता.२१-: अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबत काट्राईब शिक्षक संघटनेच्या आक्रमक भूमिकेमुळे सदर प्रकिया स्थगित करण्यात आली असल्याची माहिती कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आकाश तांबे कास्ट्राईब कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांनी दिली.

सन 2019 -20 व 20- 21 च्या संचमान्यतेनुसार मा.शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी प्रसिद्ध केलेल्या अतिरिक्त शिक्षकांच्या यादी बद्दल कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे आकाश तांबे आणि संदीप कदम यांनी हरकत घेतली . अतिरिक्त शिक्षकांच्या यादीमध्ये बरीच नावे तत्कालीन शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी दिलेल्या अनियमित वैयक्तिक शिक्षण सेवक मान्यतांमधील शिक्षकांची आहेत.तत्कालीन शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी संचमान्यता मध्ये शाळेत शिक्षकाचे पद नसता, मागासवर्गीय रोस्टर डावलून शिक्षण सेवक मान्यता दिल्या होत्या . सदर प्रकरणी तत्कालीन शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांनी सदोष निर्णय दिले होते. परंतु कास्ट्राईब शिक्षक संघटनेने सत्यवान सोनवणे यांनी दिलेल्या निर्णयांवर तीव्र आक्षेप घेतला.मुळात सत्यवान सोनवणे हेच एक भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांची अशाच प्रकारच्या अनियमित मान्यता दिल्या प्रकरणी विभागीय चौकशी शासनाने सुरू केली आहे.ही बाब शासनाच्या लक्षात आणून दिल्यामुळे मा.शिक्षण आयुक्त यांनी सदर प्रकरणी पुन्हा मा.शिक्षण संचालकांना चौकशीचे आदेश दिले.या प्रकरणी शिक्षण संचालक स्तरावर चौकशी सुरू आहे असे असताना यामधील प्रकरणातील शिक्षकांना अतिरिक्त शिक्षक म्हणून अन्य शाळेत कसे काय समोयोजन करता असा प्रश्न तांबे आणि कदम यांनी उपस्थित केला. त्यामुळे अशा शिक्षकांचे वेतन जरी सुरू झाले असले तरी त्यांच्या बाबतील निर्णय अजून प्रलंबित आहे.
सदर प्रकरणी चौकशी सुरू आहे असे असताना अशा शिक्षकांना आपण अतिरिक्त करून शासनाची दिशाभूल करत आहात. अशी भूमिका कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने आकाश तांबे आणि संदीप कदम यांनी मांडली. तसेच काही शाळांमध्ये ज्या शिक्षकांना पद नसताना मान्यता दिल्या आहेत त्या शिक्षकांना त्याच शाळेत ठेऊन अन्य शिक्षकांना विशेषतः मागासवर्गीय शिक्षकांना अतिरिक्त केलेले आहे ही बाब शिक्षणाधिकारी डॉ.मुश्ताक शेख यांच्या निदर्शनास आणून दिली .
डॉ. मुश्ताक शेख यांनी अतिरिक्त शिक्षकांची प्रक्रिया स्थगित करून अशा शिक्षकांच्या बाबतीमध्ये आपण शासनाकडे मार्गदर्शन घेऊ असे आश्वासन दिले . मात्र जे शिक्षक नियमाप्रमाणे अतिरिक्त झालेले आहेत त्यांचे समायोजन करायला कास्ट्राईब शिक्षक संघटनेची कोणतीही हरकत नाही असेही आकाश तांबे आणि संदीप कदम यांनी स्पष्ट केले.
कास्ट्राईब संघटनेच्या या भूमिकेमुळे माध्यमिक विभागातील काही एजंटांचे धाबे दणाणले आहेत. माध्यमिक शिक्षण विभागात सद्या मोठ्या प्रमाणात एजटांचा सुळसुळाट झाला आहे.त्यांचा वेळीच बंदोबस्त करावा असा इशाराही कास्ट्राईब संघटनेने दिला असल्याचे कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आकाश तांबे ,कास्ट्राईब कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांनी सांगितले.

You cannot copy content of this page