माजी सभापती उदय परब यांनी दिला इशारा
*💫मालवण दि.२७-:* ओझर कांदळगाव मसुरे बांदिवडे ते आडवली रस्ता खड्डेमय झाला असून अनेक छोटे मोठे अपघात होऊन ग्रामस्थ जखमी होणे तसेच वाहनांचे नुकसान होत आहे. सदर रस्ता कामाबाबत महिन्याभरात २५ फेब्रुवारीपर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्यास २६ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा माजी सभापती उदय परब यांनी दिला आहे. आमदारांनी आठ दिवस मसुरे येथे वास्तव्य करावे आणि दुचाकी वाहनावरून कांदळगाव मार्गे प्रवास करावा म्हणजे येथील ग्रामस्थांच्या वेदना समजू शकतील. दु चाकी वाहनावरून प्रवास करणाऱ्यांना मानेचा आणि पाठीचा त्रास सुरू झाला आहे तसेच दुचाकी वाहने खिळखिळी झाली आहेत. भविष्यात कितीतरी जणांना त्रास होणार असून ‘सदैव आपल्या सोबत’ म्हणणारे आमदार ग्रामस्थांच्या ह्या दुखण्याची जबाबदारी घेणार का? असा सवाल माजी सभापती उदय परब ह्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
