म्हापण प्रभाग, मळेवाड केंद्राची बाजी

जिल्हा परिषद राष्ट्रगीत गायन स्पर्धा निकाल जाहीर

ओरोस ता.१९-:

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रगीत गायन स्पर्धेत लहान शालेय गटात वेंगुर्ला तालुक्यातील म्हापण प्रभागाने प्रथम क्रमांक मिळविला आहे तर मोठ्या खुल्या गटात सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड केंद्राने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने सिंधुदुर्ग नगरी येथील शरद कृषी भवन मध्ये 17 ऑगस्ट रोजी ही स्पर्धा संपन्न झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने व श्रीफळ वाढवून या स्पर्धेचा शुभारंभ झाला होता. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई, जिल्हा परिषद सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वल्लरी गावडे यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेच्यावतीने प्रथम पंचायत समिती स्तरावर राष्ट्रगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यातील विजेत्या स्पर्धकातून जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रसन्न प्रभूतेंडूलकर, तृप्ती कांबळे, प्रफुल्ल रेडवडेकर यांनी काम पाहिले.
लहान शालेय गटात वेंगुर्ला तालुक्यातील म्हापण प्रभागातील मुलांनी गायलेले “वंदे मातरम” हे राष्ट्रगीत प्रथम ठरले. याच तालुक्यातील तुळस प्रभागातील मुलांनी गायलेले “अमृत महोत्सव गाव चला रे” हे गीत द्वितीय आले. तर सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद माडखोल शाळेच्या विद्यार्थ्यांनी गायलेले “नील गगन मे” हे गीत तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. मोठ्या खुल्या गटात सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड केंद्रामधील मुलांनी गायलेले “जयोस्तुते” हे गीत प्रथम आले. तर द्वितीय क्रमांक देवगड पंचायत समितीच्या “मी भारतीय आहे” या गीताने मिळविला. तृतीय क्रमांक कुडाळ पंचायत समितीच्या “जहा डाल डाल पर” या गीताने मिळविला. या सर्व विजेत्या स्पर्धकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page