संरक्षक भिंतींच्या कामाची चौकशी करण्याचीही केली मागणी
*💫सिंधुदुर्गनगरी दि.२७-:* झरेबांबर हरिजन वाडी स्मशानभूमी संरक्षक भिंतीचे काम मंजूर होऊन तीन वर्षे झाली तरीही अद्याप काम पूर्ण झालेले नाही. या कामाची चौकशी करावी व संबंधितांवर कारवाई व्हावी. या मागणीसाठी झरेबांबर रमाई नगर ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन केले. दोडामार्ग तालुक्यातील झरेबांबर हरिजन वाडी ग्रामस्थांनी आज तारीख २७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. या आंदोलनात दीपक शिवराम जाधव, सुभाष जाधव ,सुनील जाधव ,तुषार जाधव, दत्ताराम जाधव, यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झालेले आहेत. दोडामार्ग झरेबांबर हरिजन वाडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, झरे बांबर हरिजन वाडी येथे जिल्हा वार्षिक योजना जनसुविधा अंतर्गत २०१७- १८ मध्ये स्मशानभूमी संरक्षक भिंत बांधकाम करणे हे काम मंजूर झालेले आहे. सदर काम सुरू करण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासन आज पर्यंत नेहमीच अडथळा निर्माण करीत आहे. काम मंजूर होऊन तीन वर्षे झाली तरीही अद्याप संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झालेले नाही. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर सरपंच आणि ग्रामसेवक यांनी हे काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानुसार संबंधित ठेकेदाराने स्मशानभूमि कडे जाणारा रस्ता जेसीबीच्या साह्याने कच्च्या स्वरूपात तयार केला. मात्र संरक्षक भिंतीचे बांधकाम ठेकेदाराला सांगून सरपंच यांनी थांबवले आहे. असा आरोप झरेबांबर हरिजन वाडी ग्रामस्थांनी केला आहे. २०१७- १८ मध्ये जनसुविधा योजनेअंतर्गत दोन कामे मंजूर झाली होती. यापैकी गावठाण स्मशान शेड बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. तर हरिजन वाडी स्मशानभूमी संरक्षक भिंतीचे काम जाणीवपूर्वक रखडून ठेवण्यात आले आहे. तरी या बाबत झरेबांबर ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. या मागणीसाठी आज बुधवारी झरेबांबर हरिजन वाडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
